मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी, काही जणांनी पुन्हा राजकारण सुरु केलं असल्याचं म्हटलं होतं. राजकीय वादळाशी लढण्यास मी समर्थ असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्ष राजकारण करतंय, असं मुख्यमंत्र्यांचा दावा आहे. मग कंगना रानौतचा विषय महाराष्ट्रात कोणी सुरु केला? तुम्हीच केला ना, असा सवालही पाटील यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एफआयआर दाखल करुन मुंबई पोलिसांनी योग्य चौकशी केली असती, तर केंद्रीय तपास यंत्रणांना काहीच करावं लागलं नसतं. त्यामुळे आता तुम्हाला आपला मुखवटा बाजूला सारण्याची गरज असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 


सुशांत सिंह प्रकरणात. केंद्राच्या तपास यंत्रणांनी आतापर्यंत जी कारवाई केली त्याला राजकारण नाही, तर प्रशासकीय कार्यपद्धती म्हणतात असं म्हणत त्यांनी, मुख्यमंत्री ठाकरे यांनी मास्क लावल्यामुळे कदाचित त्यांना विरोधी पक्ष राजकारण करतंय, असं वाटत असेल. पण त्यांनी मास्क बाजूला केल्यास वस्तूस्थिती समजू शकेल, असा टोला लगावला आहे. 


दरम्यान, काही जणांनी पुन्हा राजकारण सुरु केलं आहे. मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की, माझ्याकडे काही उत्तर नाही. पण महाराष्ट्राच्या बदनामीचा जो काही डाव आखला जात आहेत, राजकारण केलं जात आहे, त्यावर मी कधीतरी मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून नक्की बोलेन, असं मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना म्हटलंय.