भाजपने केला शिवसेनेचा गेम
कोकण भवनातील महापालिकेतील राजकीय पक्षांच्या गटनोंदणीचे काम पाहणाऱ्या दोन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ मंत्रालयात मिटिंगच्या नावाखाली बोलवून घेतले आहे.
मुंबई : कोकण भवनातील महापालिकेतील राजकीय पक्षांच्या गटनोंदणीचे काम पाहणाऱ्या दोन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ मंत्रालयात मिटिंगच्या नावाखाली बोलवून घेतले आहे.
शिवसेनेने मनसेचे नगरसेवक घेवून येणार असल्याची कल्पना देवूनही प्रादेशिक उपसंचालक, (नगरपरिषद प्रशासन) सुधाकर जगताप आणि तहसिलदार राजेश वैष्णव मात्र मुंबईतील मंत्रालयात असल्याची माहिती मिळत आहे.
यामुळं मनसे नगरसेवकांना गळाला लावूनही शिवसेनेला पाठिंबा देण्याचा डाव भाजपने उधळला आहे.
उद्या दुसरा शनिवार असल्यानं कार्यालयास सुट्टी असणार आहे.
किरीट सोमय्यांचे पत्र
शिवसेनेकडून नगरसेवक खरेदीचा प्रयत्न सुरू असल्याचं पत्रच भाजप नेते खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहे. त्यातच मनसेचे काही नगरसेवक सध्या नॉट रिचेबल असल्याने या चर्चेला पुष्टी मिळाली आहे.
संख्याबळात एकाचा फरक
मुंबई महापालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता असली तरी शिवसेना आणि भाजप यांच्या संख्याबळात केवळ एकचा फरक आहे. भांडूपमधील पोटनिवडणुकीत काल भाजपची नगरसेविका विजयी झाल्यानं भाजपचं संख्याबळ ८३ वर पोहोचले तर सत्ताधारी शिवसेनेचे ८४ नगरसेवक आहेत. त्यामुळं मनसेच्या नगरसेवकांना फोडून, सत्ता टिकवण्याचा आटापिटा शिवसेनेनं सुरू केल्याचे बोलले जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेतला सत्तासंघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.