मुख्यमंत्र्यांना कणा आहे का? नितेश राणे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख
नितेश राणे यांच्या आरोपांना अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे
मुंबई : राज्यातील एसटी कर्चमाऱ्यांचं मुंबईच्या आझाद मैदानात सुरु आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आज आमदार नितेश राणे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला केला. यावेळी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली.
मुख्यमंत्र्याच्या आजारपणावर टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेच्या दुखापतीमुळे पट्टा लावावा लागला आहे. यावर बोलताना नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना उगीच गळ्याला पट्टा लावायची गरज पडली नाही, सोनिया गांधी यांच्यासमोर वाकून त्यांच्या मानेला पट्टा लागला, अशा शब्दात टीका केली. डॉक्टरांनी निष्कर्ष काढलाय या माणसाला कणा तरी आहे का? नुसतं ठाकरे लावलं म्हणजे बाळासाहेब होता येत नाही, अरे बाळासाहेब कुठे आणि हा कुठे फक्त ठाकरे लावल्याने बाळासाहेब होत नाही त्यांचं रक्त तपासण्याची वेळ आणू नका, अशा शब्दात नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
अनिल परब यांच्यावर निशाणा
एसटी आंदोलनात तुम्ही एकटे नाहीत, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं सांगताना नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. खोत यांनी इथे मच्छर चावतात असं सांगितलं, दोन तीन मच्छर मला बाटलीत द्या परब च्या घरी जाऊन सोडतो त्या कार्ट्यालाही कळेल मच्छर चावणे काय असतं, अशा खालच्या शब्दात नितेश राणे यांनी टीका केली.
गेल्या आठ वर्षांपासून परिवहन खातं शिवसेनेकडे आहे, या काळात तुम्हा काय केलं अस सवालही नितेश राणे यांनी मविआ सरकारला विचारला.
अनिल परब यांचं प्रत्युत्तर
नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही, त्यांची मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची पात्रता आहे का? त्यांच्या आरोपांना आम्ही महत्त्व देत नाही, असं सांगत अनिल परब यांनी नितेश राणे यांचे आरोप उडवून लावले.