`दुश्मनाशी लढताना घरातल्या लोकांनी एक राहायचं असतं, हे काँग्रेसला कळत नाही का?`
या साध्या गोष्टीचं बाळकडू काँग्रेस नेत्यांना मिळालेले नाही, ही गोष्ट दुर्दैवी आहे.
मुंबई: भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या उपरोधिक टीकेला रविवारी भाजप आमदार राम कदम यांनी प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा देशाच्या सैन्यावर विश्वास नाही. दुश्मनाशी लढताना घरातल्या लोकांनी एक राहायचं असतं, या साध्या गोष्टीचं बाळकडू काँग्रेस नेत्यांना मिळालेले नाही, अशी टीका राम कदम यांनी केली.
राहुल गांधींनी भारत-चीन संघर्षावर गलिच्छ राजकारण करणे सोडावे- अमित शहा
राहुल गांधी यांनी आज ट्विटरवरवरून पंतप्रधान मोदींवर उपरोधिक शब्दांत टीका केली. या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी त्यांचा उल्लेख सरेंडर मोदी Surender Modi असा केला होता. त्यामुळे भाजपचे नेते आक्रमक झाले. आमदार राम कदम यांनीही यावरुन राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. आपण जेव्हा देशाच्या पंतप्रधानांना Surender म्हणतो तेव्हा संपूर्ण देशच सरेंडर झाला, असा त्याचा अर्थ होतो. राहुल गांधी आणि काँग्रेसला आपल्या देशाच्या लष्करावर विश्वास नाही.
'घर में घुसकर मारुंगा' म्हणणाऱ्यांची भाषा आता बदलली- कन्हैया कुमार
आपल्या सैन्याने कितीही मोठी कामगिरी केली तरी काँग्रेसच्या नेत्यांना पुरावे लागतात. कारण त्यांचा आपल्या सैन्याच्या शौर्यावर विश्वासच नाही. मात्र, जपानमधील एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीवर राहुल गांधी यांचा विश्वास आहे. या बातमीचा हवाला देत देशाच्या पंतप्रधानांना 'सरेंडर' म्हणणे हा भारतीय सैन्याचा आणि भारतमातेचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी राम कदम यांनी केली.