`मुख्यमंत्री नक्की कोण; उद्धव ठाकरे, अजित पवार, संजय राऊत की आणखी कोणी.....?`
नारायण राणेंची संजय राऊतांवरही जोरदार टीकेची झोड
मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांनी गुरुवारी मुंबईतील भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून राणेंनी शिवसेनेच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी संजय राऊतांच्या वक्तव्याला महाराष्ट्राचं दुर्दैव असा उल्लेख करत राणेंनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील सत्तांतराविषयी सांगत असताना त्यांनी सध्या सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीचं अस्तित्वंच कुठे जाणवत नसल्याचं म्हणत राणेंनी तोफ डागली. दीड महिना उलटूनही जनहिताच्या दृष्टीने एकही कॅबिनेट निर्णय नाही, जीआर काढला तरीही त्यावर तारीख नसल्यामुळे तो कायदेशीर जीआर नाही ही बाब अधोरेखित करत मुख्यमंत्र्यांकडे सध्याच्या घडीला कित्येक निवेदनं ताटकळल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.
महाविकास आघाडीच्या या आतापर्यंत सरकारने कामही सुरु केलेलं नाही. आठवडेबाजाराप्रमाणे मंत्री एक दिवस मंत्रालयात येतात आणि संध्याकाळी परत जातात असं म्हणत कॅबिनेटचा कारभार म्हणजे चेष्ठा आणि मंत्रालय म्हणजे आठवडेबाजार झाल्याची टीका राणेंनी केली.
आपण सत्तेत येण्यापूर्वीच्या राजवटीत काय झालं याचीच चर्चा होते. पण, आपल्या कॅबिनेटमधून जनतेला काय द्यावं याची मात्र चर्चा केली जात नाही. त्यामुळे आता 'राज्यातील मुख्यमंत्री कोण हाच प्रश्न मला पडतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, संजय राऊत की बाहेरील आणखी कोणी व्यक्ती हा प्रश्न मला पडतो', असं म्हणत राणेंनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज्याचा कारभार ठप्प झाल्याचंही ते यावेळी म्हणाले.
राऊतांच्या वक्वव्याविषयी राणे म्हणाले....
'या पत्रकाराला नव्हे तर या व्यक्तीचा सत्तेता उतमात आला आहे. त्यांची सत्ता आली पण, सत्तेत भावाला मंत्रीपद मात्र मिळालं नाही. त्यानंतर त्यांची जितकी वक्तव्य ऐकली हे पाहता त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं कळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांबद्दल काहीही वावगं बोललात जर ते खपवून घेतलं जाणार नाही असं म्हणत राणेंनी तोफ डागली. छत्रपतींच्या कुळाबद्दल विचारणारे संजय राऊत आहे तरी कोण?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री पदाच्या स्वार्थासाठी तडजोड करणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊच नये असं म्हणत संजय राऊत यांच्या वक्तव्याचा राणेंनी निषेध केला.