मुंबई: शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्तावाटपाचा तिढा आता अमित शाह मुंबईत आल्यानंतरच सुटेल, अशी नवीन माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपकडून सत्तावाटपाचा नवा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यानुसार शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह ८ कॅबिनेट आणि ८ राज्यमंत्रीपदे देण्यात येतील. गेल्यावेळपेक्षा शिवसेनेला दोन मंत्रिपदे जास्त मिळणार आहेत. याशिवाय, केंद्रातही शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद वाढवून मिळेल. तर भाजप स्वत:कडे २३ मंत्रिपदे ठेवेल, अशी अटकळ आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, भाजपकडून शिवसेनेची अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याची मागणी सपशेल फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे आता अमित शाह मुंबईत आल्यानंतर शिवसेना माघार घेणार, का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


'युतीचा तिढा सोडवायचा असेल तर एकाला त्याग करावा लागेल'


तुर्तास शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ताठऱ भूमिका घेतलेली आहे. एकीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी कोणत्याही परिस्थितीत पाऊल मागे घेणार नाही, असे म्हटले. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी सत्तावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेना आणि भाजप यांच्यापैकी एकाला त्याग करावा लागेल, असे सांगितले. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंबईत विधिमंडळ नेत्याच्या निवडीसाठी शिवसेनेची बैठक होणार आहे. यावेळी शिवसेना कोणता मार्ग निवडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे की अनुभवी एकनाथ शिंदे?


दरम्यान, युतीमधील या धुसफुसीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याचे समजते.