महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन, भाजपकडून रमेश लटके यांना अनोखी श्रद्धांजली
Ramesh Latke Death | सध्याचं राजकारण हे अत्यंत गढूळ झालंय. शिवसेना-भाजप यांच्यात तर अत्यंत खालच्या पातळीपर्यंत टीका केली जातेय. हेवेदावे केले जातायेत. मात्र ते सर्व मतभेद हे समोरची व्यक्ती जिवंत हयात असेपर्यंत असतात.
मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : राजकारणात प्रत्येक पक्षाची आपली विचारसरणी असते. राजकारणात वैचारिक मतभेद असतात. सध्याचं राजकारण हे अत्यंत गढूळ झालंय. शिवसेना-भाजप यांच्यात तर अत्यंत खालच्या पातळीपर्यंत टीका केली जातेय. हेवेदावे केले जातायेत. मात्र ते सर्व मतभेद हे समोरची व्यक्ती जिवंत हयात असेपर्यंत असतात. व्यक्तीच्या मृत्यूनंतर संपूर्ण हेवेदावे आणि मतभेद हे संपूण जातात. याचीच प्रचिती शिवसेनेचे अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर आली. (bjp paid tribute to late shiv sena andheri east legaslative assembly constituency mla ramesh latke)
रमेश लटकेंचं 12 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 52 व्या वर्षी दुबईत निधन झालं. लटकेंच्या मृत्यूचं वृत्त समजताच एकच खळबळ उडाली. यानंतर भाजपकडून विविध ठिकाणी लटकेंना श्रद्धांजली वाहणारे बॅनर लावण्यात आले. यामुळे राज्यातील राजकीय संस्कृती कायम असल्याचं चित्र या निमित्ताने पाहायला मिळालं.
गटप्रमुख ते आमदार असा राजकीय प्रवास
रमेश लटके यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गटप्रमुख ते आमदार असा त्यांचा अफलातून राजकीय प्रवास होता. या प्रवासादरम्यान त्यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक ही आणि अशी विविध पदं यशस्वीरित्या भूषवली. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता.
लटके यांनी 1997 ते 2012 अशा सलग 3 वेळा नगरसवेक पद भूषवलं. त्यानंतर 2014 मध्ये लटके यांनी पहिल्यांदा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लटके यांनी सुरंग लावला.
आघाडीच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेल्या सुरेश शेट्टींना मतदारांनी 1999 ते 2009 अशा सलग 3 वेळा निवडून दिले होते. त्यामुळे सुरेश शेट्टींचा दबदबा होता. काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशी ही तिहेरी लढत होती.
भाजपकडून सुनील यादव मैदानात होते. तर काँग्रेसकडून सुरेश शेट्टी. मात्र जनतेने लटकेंना कौल दिला. लटकेंनी भाजपच्या सुनील यादव यांचा 5 हजार 479 मतांनी पराभव केला. तर काँग्रेसची तिसऱ्या स्थानी घसरण झाली.
यानंतर 2019 च्या लढतीत लटके यांनी अपक्ष मुरजी पटेल यांचा 16 हजार 965 इतक्या मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.