Maharashtra Politics : शासकीय कार्यालयात फोन आल्यानंतर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नमस्कार ऐवजी वंदे मातरम् म्हणावं लागणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी हा निर्णय घेतलाय. मुनगंटीवार यांच्या निर्णयाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान काँग्रेसने (Congress) नवी घोषणा केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी संवाद साधताना जय बळीराजा म्हणावं असे आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिले आहेत. 


देशातील अन्नदाता असुरक्षित आहे. बळीराजाची सगळ्यांना आठवण राहावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. वंदे मातरमला विरोध नाही, राष्ट्रगीत आणि वंदे मातरम या दोन्ही विषयी आम्हाला आदर आहे, पण जय बळीराजा म्हणण्यामागे आमची शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 


दानवेंकडून मुनगंटीवार यांच्या निर्णयाचं समर्थन
दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी सुधीर मुनगंटीवर यांच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. फोनवर नमस्कार ऐवजी 'वंदे मातरम' म्हणण्यात गैर काय असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केलाय. शिवाय ज्याला देशाप्रती स्वाभिमान आहे ते वंदे मातरम म्हणतील. मात्र असा कोणताही अध्यादेश सरकारने काढला नाही असंही दानवे यांनी स्पष्ट केलं.


या निर्णयाला रझा अकादमीने विरोध केला, यावर देखील दानवे यांनी भाष्य करत ज्याला विरोध करायचा आहे त्याला फोनवर काय म्हणायचे आहे ते म्हणावे. पण मुनगंटीवार यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे असं सांगत दानवे यांनी या निर्णयाच समर्थन केलं.