`भाजप-शिवसेना चर्चा अंतिम टप्प्यात; फडणवीसांसोबत १२-१४ जणांचा शपथविधी`
भाजप आणि शिवसेनेमध्ये पडद्यामागे चर्चा सुरु आहे
मुंबई : भाजप आणि शिवसेनेमध्ये पडद्यामागे चर्चा सुरु आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये यात तोडगा निघेल, अशी माहिती सूत्रांनी दिल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर १२-१४ जणं मंत्रीपदाची शपथ घेतील, असंही एएनआयने त्यांच्या वृत्तात म्हणलं आहे.
पुढच्या २ दिवसांमध्ये भाजप आणि शिवसेनेची बोलणी संपतील. चर्चा ही योग्य दिशेने सुरू आहे, तसंच डील फायनल करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते मंगळवारी मुंबईत बैठक घेणार आहे, असंही भाजपच्या नेत्याने एएनआयला सांगितलं.
भाजपचे नेते आणि खासदार रावसाहेब दानवे यांनीही असंच वक्तव्य केलं आहे. दोन ते तीन दिवसांत शिवसेना भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचा दावा रावसाहेब दानवेंनी केलाय. शिवसेनेसोबत भाजपाची चर्चा सुरू आहे, कोणताही वाद नाही असं दानवे म्हणाले. शिवसेना भाजपाला एकत्रितरित्या जनादेश मिळालाय, त्याचा आदर राखू असं वक्तव्य दानवेंनी केलं.
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये आहेत. फडणवीसांनी आज अमित शाह आणि नितीन गडकरी यांची भेट घेतली. तर शिवसेना नेते संजय राऊत हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली.