मुंबई : 'महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागल्यास त्यासाठी केवळ भाजपा जबाबदार असेल' असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलंय. त्यामुळे, राष्ट्रपती राजवटीवरून राजकारण तापल्याचं राज्यात दिसतंय. 'हायकमांडनं आम्हाला सत्तास्थापनेसाठी पुढे वाटचाल करण्यासाठी हिरवा कंदील दिलाय' असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट करतानाच 'राष्ट्रपती राजवट लागू करण्याची इतकी घाई का?' असा प्रश्नही विजय वडेट्टीवार यांनी विचारलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेनं वेळ वाढवून मागितली असतानाही त्यांना वेळ का वाढवून दिला गेला नाही? त्यावरून ते कायदेशीर मार्ग अवलंबवत असतील तर तो त्यांचा मार्ग आहे. राष्ट्रवादीला आज सायंकाळपर्यंतचा वेळ दिला गेलाय. त्यावर, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी चर्चा करत आहोत, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय.



राज्यात राष्ट्रपती राजवट?


महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तशी शिफारस राष्ट्रपतींना करण्यात येणार असून, त्यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे. निकाल लागून विसावा दिवस उजाडला तरी महाराष्ट्रातील सरकार स्थापनेचा घोळ संपलेला नाही. कोणत्याही एका पक्षाकडं किंवा आघाडीकडं पुरेसं बहुमत नसल्यानं राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्र सरकारला केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेसाठी ब्राझीलला रवाना होणार असल्यानं, राज्यपालांच्या शिफारशीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली. त्यात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय.