मुंबई: देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर सत्तास्थापन करण्याची जबाबदारी सोपविली आहे, असे वक्तव्य भाजप नेते नारायण राणे यांनी केले. त्यांनी मंगळवारी वर्षा बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी मला आजच्या भेटीत आपण सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करुयात, असे सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचा सदस्य म्हणून मी सत्तास्थापन करण्यासाठी जे जे करावे लागले ते करेन. मला विश्वास आहे की, भाजप लवकरच सत्तास्थापन करेल, असे नारायण राणे यांनी सांगितले. 


भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना सत्तास्थापन करण्यात अपयश आल्यानंतर मंगळवारी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी भाजप सत्तास्थापनेसाठी पुन्हा प्रयत्न करणार असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अद्याप चर्चाच सुरु आहे. तसेच शिवसेना त्यांच्यासोबत जाईल, असे वाटत नाही. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करेल. त्यासाठी माझ्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीनुसार मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे राणे यांनी म्हटले. 



यावेळी नारायण राणे यांनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडले. आता शिवसेना भाजपने पुन्हा आमच्याशी संपर्क साधल्याचे सांगत आहे. मात्र, ते आमदार फुटू नयेत म्हणून अशी वक्तव्ये करत आहेत. उद्धव ठाकरे आम्हाला शेतकऱ्यांची आणि जनतेची काळजी आहे, असे सांगतात. मात्र, ते सरकार स्थापन करायला तयार नाहीत. त्यामुळे आता भाजप  १४५ आमदारांची यादी घेऊनच राज्यपालांकडे जाईल, शिवसेनेप्रमाणे खाली हाताने राजभवनात जाऊन बसणार नाही. काँग्रेस शिवसेनेला उल्लू बनवत आहे. ही गोष्ट उद्धव ठाकरे यांना कळायला हवी, असेही राणे यांनी सांगितले.