मुंबई : राज्यात ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये लेटरवॉर सुरु आहे. राज्यातील महिला सुरक्षा आणि कायदा-सुव्यस्थेबाबत प्रश्न उपस्थित करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं होतं. याप्रश्नी दोन दिवसांचं अधिवेशन घेण्यात यावं असे निर्देश राज्यपालांनी दिले होते. या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जशास तसं उत्तर दिलं. महिला सुरक्षेचा विषय राष्ट्रव्यापी आहे, त्यामुळे राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचं चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, तशी मागणी आपण पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांकडे करावी असं मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. 


मुख्यमंत्र्यांना पाठवणार पत्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या या पत्रामुळे भाजप महिला आघाडी आक्रमक झाली असून भाजपाच्या 12 महिला आमदार मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहेत. राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत हे पत्र पाठवण्यात येणार आहे.  सावित्रीच्या लेकीचं गाऱ्हाणं मातोश्री ऐकणार का? असा सवाल या पत्रातून विचारला जाणार आहे.  राज्यात महिला अत्याचार वाढत असताना, महिला असुरक्षित असताना दिल्लीत अधिवेशन बोलावण्याची मागणी करून राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न का करताय असा सवाल भाजप महिला आमदारांनी विचारला आहे. 


महिला सुरक्षेप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. साकीनाका प्रकरणात अधिक सखोल तपास गरजेचं आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. तसंच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उत्तर प्रदेशातील गुन्हे आकडेवारी दाखवतात पण राज्यातील स्थिती यावर लक्ष द्या असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला आहे.