भाजपचं राज्यभर घंटानाद आंदोलन; मंदिरं खुली करण्याची मागणी
आंदोलनात अनेक धार्मिक संघटना आणि संस्था सहभागी...
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात गेल्या जवळपास पाच महिन्यांपासून मंदिरं, धार्मिक स्थळं बंद आहेत. राज्यातील प्रार्थना स्थळं खुली करावीत, यासाठी आज भाजपचं राज्यभरात घंटानाद आंदोलन सुरु आहे. मुंबई, शिर्डी, पुणे, नाशिकमध्येही घंटानाद आंदोलन करत मंदिरं सुरु करण्याची मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनात अनेक धार्मिक संघटना आणि संस्था सहभागी झाल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून बंद असलेली राज्यातली मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मिशन बिगेन अंतर्गत लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्यानंतर अनेक राज्यातील प्रमुख देवस्थानं भाविकांसाठी खुली करण्यात आली. मात्र राज्यात अद्यापही मंदिरं अथवा धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील मंदिरं उघडण्याची सुबुद्धी सरकारला मिळावी आणि झोपी गेलेल्या सरकारला जाग यावी, यासाठी भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करण्यात येतं आहे. नाशिकच्या रामकुंडावर हे घंटानाद आंदोलन करण्यात येतंय. सरकारला जाग यावी, यासाठी घंटानाद आणि डमरुनाद करण्यात येत असून दार उघड, उद्धवा दार उघड अशी घोषणाबाजी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
राज्य सरकार मॉल्स, दारुची दुकानं उघडू शकतं मग मंदिरं का उघडली जात नाहीत, पुजारी, मंदिराच्या आजूबाजूच्या लोकांचा राज्य सरकारने विचार केला आहे का, असा सवाल राम कदम यांनी केला आहे. दादर पोलीस ठाण्यात परवानगी मागायला आलो, पोलीसांनी परवानगी दिली नाही तरी आम्ही सिध्दीविनायक मंदिरात दर्शनासाठी जात आहोत, असं इशारा राम कदम यांनी दिला आहे.
पुण्यातही आज प्रार्थना स्थळ खुली व्हावी याकरता घंटानाद आंदोलन सुरु आहे. दार उघड, उद्धवा दार उघड या टॅगलाईनखाली आंदोलन सुरु आहे. भाजप खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पुण्यातील ओकांरेश्वर मंदिरासमोर आंदोलन सुरु झालं असून पुण्यात भाजपकडून जवळपास 100 मंदिराबाहेर आंदोलन करत मंदिर खुली करण्याची मागणी केली जात आहे. आंदोलनात उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार, संजय राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. दुसरीकडे शिर्डीतही साईमंदिर खुलं करण्याची मागणी करण्यात येत असून आंदोलन सुरु आहे.