मुंबईतील नालेसफाई, `कोस्टल` रोडवरुन भाजपचा शिवसेनेवर निशाणा
नालेसफाईबाबत आशिष शेलार यांच्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या महापालिकेला कानपिचक्या.
मुंबई : नालेसफाईबाबत आशिष शेलार यांनी महापालिकेला कानपिचक्या देत नालेसफाईबाबत दर आठवड्याला माहिती प्रसिद्ध करावी, अशीही मागणी केलीय. नालेसफाईबाबत भाजप सध्या वेगवेगऴ्या माध्यमातून आढावा घेतेय, असे सांगत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही 'पहारेकरी' आहोत, असे भाजपने आधी म्हटले होते. तिच भूमिका भाजप साकारत आहे का, याचीच राजकीय चर्चा सुरु झालेय.
‘कोस्टल रोडला शिवसेनेचा विरोध का?’
दरम्यान, नालेसफाईत दिरंगाई करणारे आणि जे कंत्राटदार काम करत नसतील तर त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा भाजपच्यावतीने शेलार यांनी दिलाय. यावेळी शेलार यांनी कोस्टल रोडच्या मुद्यावरुनही शिवसेनेला टार्गेट केलंय. कोस्टल रोडसाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी सर्व १७ परवानग्या तातडीने मिळवल्या आहेत. स्टँडिंग कमिटीतली अंडरस्टँडिंग न झाल्यामुळे कन्सल्टन्सीला विरोध होतोय का, असाही सवाल शेलार यांनी उपस्थित केलाय.
स्टँडिंग कमिटीतले अंडरस्टँडिंग
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला विरोध कशासाठी, केला जात आहे.किनारपट्टी मार्गाला शिवसेनेचा विरोध आहे का? असा सवाल करत या प्रकल्पाबाबत शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आमदार आशीष शेलार यांनी केली. त्याचबरोबर स्थायी समितीत तडजोड न झाल्यामुळे किनारपट्टी मार्ग प्रकल्पात सल्लागार नेमण्यास विरोध होत आहे का? असा खोचक सवालही त्यांनी शिवसेनेला केलाय.