भुजबळांच्या शेजारच्या कोठड्याही लवकरच भरतील-भाजपा
मात्र आता भुजबळ सुटले आणि शेजारच्या कोठड्या रिकाम्याच आहेत, असं उलट कसं झालं...
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना भ्रष्टाचार प्रकरणी, उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर, भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छगन भुजबळ यांना अटक झाल्यानंतर जेलमधील शेजारच्या कोठड्या रिकाम्या आहेत, असं आव्हान सत्ताधारी भाजपच्या काही नेत्यांनी दिलं होतं, मात्र आता भुजबळ सुटले आणि शेजारच्या कोठड्या रिकाम्याच आहेत, असं उलट कसं झालं, असा प्रश्न विचारल्यावर भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी पुढील प्रतिक्रिया दिली आहे.
भुजबळांच्या शेजारच्या कोठड्याही भरतील...
वरील प्रश्नाला उत्तर देताना माधव भांडारी म्हणाले, 'कोठड्या भरल्या किंवा खाली राहिल्या त्याला महत्व नाही. तर सिंचन घोटाळ्यातील प्रमुख आरोपींवरची कोणतीही चौकशी थांबलेली नाही, कोणतीही प्रक्रिया थांबलेली नाही, त्यामुळे ज्या कोठड्या रिकाम्या राहिल्याबद्दल आपल्याला वाईट वाटतंय, कालंतराने आपल्याला असं लक्षात येईल, त्या कोठड्या भरतायत, आणि आपल्याला आनंद व्यक्त करता येईल.
भुजबळांच्या जामीनावर भांडारी म्हणाले...
छगन भुजबळांना जामीन हा न्यायालयीन प्रक्रियेतील पहिला आणि अपरिहार्य टप्पा आहे. हा काही त्यांच्या प्रकरणाचा निकाल नाही. त्यांच्या प्रकरणातील सत्य असत्यता पाहून दिलेला हा निकाल आहे, अशातला भाग नाही. तरत्यांनी २ अडीच वर्ष जेलमध्ये काढल्यानंतर त्यांच्या तब्येतीची परिस्थिती पाहिल्यानंतर, बहुदा न्यायालयाने त्यांना जामीन दिला असावा, असं माधव भांडारी यांनी म्हटलं आहे.
तपास यंत्रणांनी योग्य दिशेने तपास केला आहे-भाजप
२२ महिने, २६ महिने, ३० महिने जर ज्यांना जेलमध्ये राहावं, लागलं तर ईडी आणि अन्य तपास यंत्रणांनी योग्य तपास केला, न्यायालयासमोर त्यांनी परिस्थिती मांडून दिली की, यांना जामीन देण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे भुजबळांना यानंतर एवढ्या दिवसांनी जामीन मिळाला असेल, तर ते सामान्य आहे. तो प्रत्येकाला दिला जातो, त्याप्रमाणे त्यांना मिळाला असावा, असं देखील माधव भांडारी यांनी म्हटलं आहे.