महाराष्ट्रातून भाजपचा मिशन 45+चा नारा, ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याची तयारी
महाराष्ट्रातून भाजपनं मिशन 45+चा नारा दिलाय.. त्यासाठी ठाकरेंचा एकेक बालेकिल्ला भाजपनं हेरलाय आणि त्याची सुरुवात केलीय दक्षिण मुंबईतून.. दक्षिण मुंबईत अरविंद सावंतांविरोधात भाजपनं अशी काही रणनीती आखलीय की टक्कर कांटें की होणार यात शंका नाही.
BJPs Mission Maharashtra : निवडणुका उंबरठ्यावर आहेत आणि ठाकरे गटाला (Thackeray Group) जेरिस आणण्याची एकही संधी भाजप (BJP) सोडत नाही. ठाकरेंची ताकद असणाऱ्या मुंबईतच ठाकरेंना गुडघे टेकायला भाग पाडायचं यासाठी भाजपनं प्लॅन आखलाय आणि त्याची सुरुवात होतेय दक्षिण मुंबईतून. दक्षिण मुंबईत ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार अरविंद सावंतांना (Arvind Sawant) उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झालंय. त्यामुळेच ठाकरेंच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची तयारी भाजपनं सुरु केलीय..
दक्षिण मुंबई हेरलं, सावंतांना घेरलं
दक्षिण मुंबईची जबाबदारी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपावण्यात आलीय. वरळी, भायखळा, शिवडी, मुंबादेवी या भाजपकडे नसलेल्या विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केलंय. पण भाजप कितीही नाचलं तरी फरक पडणार नाही असा टोला खासदार अरविंद सावंतांनी लगावलाय..
दक्षिण मुंबईचा इतिहास काय?
या लोकसभा मतदारसंघावर कुठल्याही एका पक्षाला वर्चस्व टिकवता आलं नाही. 2014, 2019 असे सलग दोन टर्म मिलिंद देवरांचा पराभव करत अरविंद सावंत निवडून आले. 2004 ते 2014 पर्यंत मिलिंद देवरा मतदारसंघात खासदार होते. 1996 ते 2004 पर्यंत काँग्रेसचे मुरली देवरा आणि भाजपच्या जयंतीबेन मेहता यांच्यात कांटे की टक्कर होती
दक्षिण मुंबई ही देवरा कुटुंबाची पारंपरिक जागा मानली जाते. मात्र अरविंद सावंतांनी दोन वेळा इथून मिलिंद देवरांचा पराभव केला. आता ठाकरे गट आणि काँग्रेस यांची आघाडी आहे. त्यामुळे या मतदारसंघात मविआची ताकद भाजपच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळेच हा मतदारसंघ ठाकरे गटाकडून खेचून घेण्यावर भाजपनं विशेष लक्ष देणं सुरु केलंय.
16 मतदारसंघावर विशेष लक्ष
दक्षिण मुंबईबरोबच दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई तसंच ठाणे, कल्याण हे मुंबई महानगर क्षेत्रातले मतदारसंघ, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, विदर्भातील अमरावती, वाशिम, उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिरूर, इचलकरंजी हे मतदारसंघ भाजपच्या रडारवर आहेत.
गेल्या 25 वर्षांपासून शिवसेना-भाजप लोकसभा निवडणुका एकत्र लढत होते. त्यामुळे शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपची ताकद कमी राहिली. मात्र आता अशा जागांसाठी भाजपनं खास रणनीती आखलीये. त्यातच आता शिवसेना शिंदे गट भाजपबरोबर आल्याने भाजपची ताकद वाढलीय. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाची साथही भाजपला मिळणार आहे.