कुर्ला ते सायन स्थानकांदरम्यान सहा तासांचा ब्लॉक, अशी असेल वाहतूक
या कामामुळे मुंबई-पुणे, मुंबई-मनमाड मार्गावरील दहा एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्यात.
मुंबई : कुर्ला ते सायन स्थानकांदरम्यान असलेला धोकादायक पादचारी पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वे रात्रकालीन सहा तासांचा ब्लॉक घोषित केलाय. शनिवारी रात्री साडेअकरा ते रविवारी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत हे पाडकाम सुरु असेल. या कामामुळे मुंबई-पुणे, मुंबई-मनमाड मार्गावरील दहा एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्यात. याशिवाय लोकल गाड्या आणि इतर एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावणार आहेत. मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरही विशेष ब्लॉक घोषित केलाय. परिणामी अप-डाऊन मार्ग वडाळा ते मानखुर्ददरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.
अशी वाहतूक
सीएसएमटी इथून पनवेल, बेलापूर आणि वाशीसाठी सुटणाऱ्या लोकल रात्री १०.५८ ते मध्य रात्री १२.४० तसंच रविवारी पहाटे ४.३२ ते ५.५६ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्स हार्बर मार्गावरुन प्रवास करण्याची मुभा देण्यात आलीय. पश्चिम रेल्वेच्या वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यानही शनिवारी रात्री साडेबारा ते पहाटे ४ वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आलाय.