सुमन अग्रवाल, नेहा सिंह, झी मीडिया, मुंबई : येत्या १ जूनपासून खाण्यासाठीचा बर्फ आणि इतर कामांसाठी वापरला जाणारा बर्फ यात फरक करणं सोप्पं होणार आहे. कारण अन्य व्यावसायिक कामांसाठी उपयोगात येणाऱ्या बर्फाचा रंग निळा असणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तहान भागवण्यासाठी गारेगार बर्फाचा गोळा किंवा थंडगार लिंबू पाणी प्यायचा मोह सर्वांनाच होतो. पण त्यात वापरला जाणारा बर्फ खरंच खाण्यायोग्य असतो का? यापुढे तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. कारण खायचा बर्फ आणि इतर व्यावसायिक कामांसाठी वापरला जाणारा बर्फ यात फरक करणं सोप्पं होणाराय. येत्या १ जूनपासून इतर कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या बर्फाचा रंग चक्क निळा असणाराय. निळा रंग टाकूनच बर्फाचं उत्पादन करण्याचं बंधन आइस फॅक्टऱ्यांवर घालण्यात आलंय. खाद्य पदार्थ सुरक्षा नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या एफएसएसएआयनं तसे आदेश जारी केलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खाण्यासाठी वापरला जाणारा बर्फ स्वच्छ पाण्यापासून तयार होतो... तर अनेकदा वस्तू खराब होऊ नयेत यासाठी वापरला जाणारा बर्फ खड्डे आणि तलावातल्या पाण्यापासून तयार होतो. त्या पाण्यात असलेल्या विषाणूंमुळं अनेकदा आजार पसरतात. मुंबईत केलेल्या पाहणीत बाजारात विकल्या जाणाऱ्या बर्फात मोठ्या प्रमाणात विषाणू आढळले.


खरंतर स्वच्छ पाण्यापासून तयार केलेला बर्फ महाग असतो. तर व्यावसायिक वापरासाठीचा बर्फ स्वस्तात मिळतो. अनेकदा बर्फ मिळत नसल्यानं किंवा जादा कमाईच्या हव्यासापोटी दोन्ही बर्फांचं मिश्रण करून ते ग्राहकांना दिलं जातं. पण आता तसं केल्यास कारवाई होणार आहे.