मुंबई : लसीचे दोन डोस घेतलेल्यांना येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना पास मिळणार आहे. मात्र हा पास मिळणार कसा याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम होता. याबाबत मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (BMC commissioner Iqbal Chahal) यांनी माहिती दिली आहे. जवळपास 19 लाख लोकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. डोस घेऊन 14 दिवस झाल्यानंतर ओळखपत्र दिलं जाईल. त्यानंतरच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे, अशी माहिती इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवाशांकडे लसीकरणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असून त्या प्रमाणपत्राचा नंबर आणि संबंधित प्रवाशाच्या फोटोच्या आधारावर पास दिला जाईल तसंच हा पास अॅपमार्फत ऑनलाईन पद्धतीनेही काढता येईल, ज्या लोकांना ऑनलाईन पास काढणं शक्य नाही त्यांना ऑफलाईन पास देण्याची सुविधा देण्यात येईल अशी माहिती इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.



लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी वॉर्ड ऑफिसमध्येही ऑफलाईन पद्धतीने पास मिळतील अशी माहिती इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे. तसंच दोन डोस घेतलेल्यांनाच मॉल आणि रेस्टॉरंटमध्ये प्रवेश देण्याचा विचारही सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण मुंबईकरांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट्य असून दोनही डोस पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे, अशी माहितीही इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.


धारावीमध्ये लस घेण्यासाठी गर्दी


दोन डोस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्ट पासून लोकल ने प्रवास करण्याची मुभा असणार अशी घोषणा केल्यानंतर आज मुंबईत लसीकरण केंद्रावर याचा परिणाम पाहायला मिळत आहे. दुसरा डोस घेण्यासाठी धारावीत नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. अनेकांचं पोट हे लोकल प्रवासावर अवलंबून आहे त्यामुळे दुसरा डोस पूर्ण करण्यासाठी अनेकांनी लसीकरण केंद्रावर हजेरी लावली.