भटक्या कुत्र्याच्या चाव्याने चिमुरड्याने बापाच्या कुशीत सोडला जीव, मुंबई मनपाने घेतला मोठा निर्णय
`रेबिजमुक्त मुंबई’ साठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकर घेतला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 6 प्रशासकीय विभागांमधील 15 हजार भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण होणार आहे. राज्यात पहिल्यांदाच मोबाईल ॲपआधारित रेबिज लसीकरण केलं जाणार आहे.
BMC Mission Rabies Free Mumbai : भटाक कुत्रा चावल्याने एका लहान मुलाचा रेबीज (Rabies) होऊन मृत्यू झाला. 14 वर्षांच्या या मुलाने भीतीमुळे कुत्रा (Stray Dogs) चावल्याचं आपल्या घरच्यांना सांगितली नाही, पण महिन्याभरानंतर त्याचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. मुलाला कुत्रा चावला हे घरच्यांना कळलं तोपर्यंत बराच उशीर झाला होता. मुलाच्या बापाने मुलाला रुग्णालयात नेलं पण वाटेत बापाच्या कुशीतच मुलाने जीव सोडला. या घटनेचा व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरला होत आहे. या घटनेने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न देशभरात पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
'रेबिजमुक्त मुंबई'
'रेबिजमुक्त मुंबई' साठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि 15 स्वयंसेवी संस्थांच्या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 6 प्रशासकीय विभागातील 15 हजार भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण (Vaccination) करण्यात येणार आहे. लसीकरणानंतर प्रायोगिक तत्वावर काही भटक्या श्वानांच्या गळ्यात 'क्यूआर कोड' असलेले 'कॉलर' घालण्यात येणार आहेत. परिणामी, क्यूआर कोड स्कॅन केल्यावर श्वानाच्या माहितीसह त्याला खाद्य देणाऱ्याचा (फिडर) तपशील, लसीकरण आणि वैद्यकीय माहिती प्राप्त होण्यास मदत मिळणार आहे. हे लसीकरण मोबाईल ॲपआधारित होणार असून राज्यात पहिल्यांदाच मोबाईल ॲपआधारित रेबिज लसीकरण करण्यात येणार आहे.
28 सप्टेंबर 2023 रोजीच्या आंतरराष्ट्रीय रेबिज दिवसाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 'रेबिजमुक्त मुंबई' करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई शहर वाहतूक विभाग, बोरिजर इंगलहाईम, पेट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ मुंबई या स्वयंसेवी संस्थेसह इतर 15 स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने 29 सप्टेंबर 2023 ते 10 ऑक्टोबर 2023 या 10 दिवसांच्या कालावधीत पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एस आणि टी विभागातील जवळपास 15 हजार भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी शंभर कर्मचारी कार्यरत असणार आहेत. केवळ लसीकरणावर न थांबता श्वानांच्या आरोग्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आता अत्याधुनिक उपाययोजनादेखील राबविणार आहे.
2014 मधील सर्वेक्षणानुसार, मुंबईमध्ये सुमारे 95 हजार भटके श्वान होते. ती संख्या आता सुमारे 1 लाख 64 हजारांवर पोहोचल्याचा अंदाज आहे. या भटक्या श्वानांना रेबिज या रोगाची लागण होऊ नये तसंच त्यापासून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांना रेबिज प्रतिबंधक लस देणं गरजेचे असतं. दर दहा वर्षांनी श्वान जनगणना होते. त्यानुसार जानेवारी 2024 मध्ये मुंबईतील भटक्या श्वानांचे सर्वेक्षण प्रस्तावित आहे. त्या सर्वेक्षणाच्या आधारे फेब्रुवारी 2024 मध्ये व्यापक स्तरावर रेबिज लसीकरणाची मोहीम प्रस्तावित आहे. या मोहीम अंतर्गत केवळ दहा दिवसांच्या कालावधीत सुमारे 1 लाख भटक्या श्वानांना रेबिज प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन आहे.
मोबाईल अॅपच्या माध्यमातून माहिती
मोबईल ॲपच्या माध्यमातून भटक्या श्वानांची माहिती एकत्रित केली जाणार आहे. त्यानंतर स्वयंसेवी संस्थांच्या सहायाने श्वानांचे रेबिज लसीकरण करण्यात येणार आहे. तसंच, प्राथमिक आरोग्य तपासणीदेखील करण्यात येणार आहे. लसीकरण करण्यात आलेल्या श्वानाचा फोटो, लसीकरण करण्यात आलेले ठिकाण आणि त्याच्या आरोग्याची माहिती या मोबाईल ॲपमध्ये एकत्रित करण्यात येणार आहे. यापुढील काळातही ही मोहीम सुरू राहणार आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख तथा देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे.