मुंबई : विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सरकार आले तर १० रुपयांत सर्वसामान्यांना थाळी देण्याचे आश्वासन दिले होते. आता ही थाळी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये १९ डिसेंबरपासून १० रुपयांच्या थाळीची सुरुवात करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दहा रुपयांत थाळीची घोषणा केली होती. ही थाळी कधीपासून उपलब्ध होणार याबाबत चर्चा सुरु असताना पालिकेच्या कॅन्टिनमध्ये १० रुपयांत जेवणाची थाळी सुरु करण्यात आली आहे. या जेवणाच्या थाळीमध्ये दोन चपात्या, भात, डाळ आणि दोन भाज्या असा आहार असणार आहे. परंतु ही थाळी केवळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. 



उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर ही घोषणा प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महागाई लक्षात घेता दहा रुपयांच्या थाळीसाठी प्रत्यक्षात जवळपास ५० रुपयांचा खर्च येणार आहे. उर्वरित ४० रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्याचा मुद्दा या प्रस्तावात असल्याची माहिती मिळत आहे. या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासून तो लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येणार आहे. 


दरम्यान, नागपूरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशन सुरु असताना विधानभवनाच्या अवती-भोवती ५ ठिकाणी स्टॉल लावण्यात आले आहेत. नागपूर पोलिसांनी बंदोबस्तासाठी आलेल्या हजारो पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी १० रुपयांची खास थाळी सुरू केली आहे. चपाती, भाजी, भात, मिठाई आणि सलाड असं या थाळीचं स्वरूप आहे. 


रोज ६ हजार पोलीस कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच गरम जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. ड्युटीच्या ठिकाणी वेळेत जेवण मिळत असल्याने महत्वाची सेवा उपलब्ध झाल्याची भावना पोलीस कर्मचारी व्यक्त करत आहेत.