कथित खिचडी घोटाळा प्रकरण! संजय राऊत यांनी आरोप केलेला `तो` तिसरा कोण?
BMC Khichadi Scam : मुंबईत महापालिकेत झालेल्या कथित खिचडी घोटाळाप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कनाल, अमेय घोले आणि वैभव थोरात या तिघांची नावं घेतली होती. यापैकी राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. पण तिसरा म्हणजे वैभव थोरात कुठे आहे असा प्रश्न उपस्थित झालाय.
BMC Khichadi Scam : कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित खिचडी घोटाळ्यावरुन शिवसेना शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटात (Thackeray Group) जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. खिचडी घोटाळ्याचे (Khichadi Scam) लाभार्थी आज भाजप आणि मिंधे गटात आहेत. या लाभार्थ्यांनी खिचडीचे वाटप न करता त्याचे पैसे लाटले असा आरोप शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. यावेळी संजय राऊत यांनी राहुल कनाल, अमेय घोले आणि वैभव थोरात या तिघांची नावं घेतली. या तिघांनी मुंबई महापालिकेत कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांच्या आरोपाला राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही या खिचडी घोटाळ्यात नाही तर कोणत्याच कोविड घोटाळ्यात सहभागी नाही, असल्यास आम्ही राजकारणचं सोडू असं सांगत प्रत्युत्तर दिलं.
संजय राऊत यांचा आरोप
'खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी आज भाजप आणि मिंधे गटात आहेत. त्यातल्या काही लोकांची कॅटरींग सेवा देवगिरी आणि वर्षा बंगल्यावर सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. मिंधे गटातील खासदाराची त्यांच्याशी पार्टनरशिप आहे. बिलं काढली पण खिचडी वाटली नाही. राहुल कनाल, अमेय घोले आणि वैभव थोरात यांनी कोट्यवधींचा घोटाळा मुंबई महापालिकेत केला आहे. यांची नावे घेण्याची सोमय्या आणि ईडीची हिम्मत आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कोविड खिचडी घोटाळ्या प्रकरणी युवासेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांवरती गंभीर आरोप केले. यापैकी दोनच जणांनी म्हणजे अमेय घोले , राहुल कनाल यांनी पत्रकार परिषद घेतली. घोटाळ्यांबाबत राऊतांनी केलेले आरोप जर खोटे ठरले तर राऊत राजकारणातून निवृत्ती घेतील का असं असं खुलं आव्हान कनाल यांनी दिलं.
'तो' तिसरा कोण? अनेक प्रश्न उपस्थित
मात्र संजय राऊत यांनी घेतलेलं तिसरं नाव वैभव मारुती थोरात (Vaibhav Thorat) या पत्रकार परिषदेत का नाही आला? असा सवाल विचारला जातोय. यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
वैभव थोरात याच्या बँक अकाऊंटमधून कोणाकोणाला आर्थिक लाभ मिळाला?
वैभव थोरातबद्दल कोणतेच भाष्य करणं अमेय घोले आणि राहुल कनाल यांनी का टाळले?
वैभव थोरात याच्या बँक खात्यातून महानगर पालिकेच्या किती अधिकाऱ्यांना आर्थिक लाभ अथवा वाहनांची व्यवस्था झाली?
वैभव थोरात याच्या बँक खात्यातून सुरज चव्हाण आणि त्याचा खाजगी सचिव जसप्रीत सिंग वढेरा याच्या बँक खात्यात या कोविड घोटाळ्यातील किती रक्कम जमा झाली?
याबाबत अमेय घोले यांनी कोणतीच प्रतिक्रिया का दिली नाही ?
मनसे नेते संदीप देशपांडे यांनीसुद्धी वैभव थोरात याच्यावर आरोप केले होते. पण वैभव थोरातव कोणतीच कारवाई झाली नाही. सध्या शिंदे गटात शिवसेना सचिव या पदावर कार्यरत असलेल्या आणि अनेकदा कोविड घोडाळ्यात सातत्याने नाव समोर येणाऱ्या वैभव थोरातवर कारवाई कधी होणार? वारंवार कोविड घोटाळ्यात ज्याचे नाव समोर येत आहे त्या वैभव थोरातवर कारवाई न होण्यासाठी कोणाचा दबाव तर तपास यंत्रणेवर होत नाही ना ? का शिंदे पिता पुत्राच्या वरदहस्तामुळे वैभव थोरातचा बचाव होतोय असा आरोपही केला जात आहे.