मुंबई : गोरेगावमध्ये गटारात पडलेल्या दीड वर्षाच्या दिव्यांशचा शोध सुरूच आहे. बुधवारी रात्री दिव्यांश उघड्या गटारात पडला. जवळपास २० तास उलटले तरी तो अद्याप सापडलेला नाही. घटनास्थळी महापौर पोहोचताच माध्यमांनी घेराव घालणं सहाजिक होतं. यावेळी जबाबदारी घेणं सोडा महापौरांनी प्रतिनिधींनाच धक्का मारण्याचा प्रयत्न केला. झी मीडियाच्या प्रश्नांच्या सरबत्तीवर महापौरांची बोलती पुरती बंद झाली. मुंबईमध्ये गेल्या साडे पाच वर्षांत मॅनहोल्स, गटार आणि समुद्रामध्ये बुडण्याच्या तब्बल ६३९ दुर्घटना घडल्यायत. यामध्ये ३२८ लोकांचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेचा निष्काळजीपणा चिमुकल्याच्या जीवावर बेतला. दोन वर्षं झाली गटारावर झाकण ठेवलं गेलं नाही. महापालिकेचं हेच ते पाप दीड वर्षाच्या दिव्यांशच्या जीवावर उठलं. गोरेगाव पूर्व आंबेडकर नगर भागात ही दुर्घटना घडली. रात्री दहा वाजता दिव्यांश सिंह घराबाहेर चालता चालता उघड्या गटारात पडला. रात्रीपासून शोधमोहीम सुरू आहे.


ज्या गटारात दिव्यांश पडला ते ३ ते ४ फूट खोल होती. त्यातच पावसामुळे पाण्याचा प्रवाह जोरात होता. गेली दोन वर्षं या गटारावर झाकण नाही. स्थानिकांनी तक्रारी करुनही त्याची दखल घेतली नाही. 


कुठलीही दुर्घटना घडली की महापालिका चौकशी करते. तशीच चौकशी याही प्रकरणाची होणार आहे. पण चौकशी करण्याऐवजी आधी खबरदारी घ्यावी लागते, हे किती बळींनंतर महापालिकेला समजणार आहे.