मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आलीय. तर उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची निवड करण्यात आलीय. प्रभादेवी भागातून किशोरी पेडणेकर या सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्यात. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी किशोर पेडणेकर आणि सुहास वाडकर यांना शुभेच्छा दिल्यात.


महापौर किशोरी पेडणेकर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्लेखनीय म्हणजे, किशोरी पडणेकर मुंबई महापालिकेच्या ७ व्या महिला महापौर आहेत. यातील ५ महिला महापौर शिवसेनेच्या होत्या. किशोरी पेडणेकर यांनी २२ नोव्हेंबर रोजी महापौरपदाचा आपला अर्ज दाखल केला होता. तर भाजपकडून आमदार आशिष शेलार यांनी मात्र संख्याबळ नसल्यानं आपला उमेदवार देणार नसल्याचं जाहीर केलं होतं. तर राज्यात 'महाविकास आघाडी'ची चर्चा सुरू असताना काँग्रेसनं महापौर - उपमहापौर पदासाठी शिवसेनेविरुद्ध उमेदवार न देण्याचा निर्णय जाहीर केला होता. सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महापौर म्हणून नगरसेविका किशोरी पडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं.



उपमहापौर सुहास वाडकर


उपमहापौरपदी निवड झालेले सुहास वाडकर हे व्यवसायानं वकील आहेत. वाडकर पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेत. 


देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेत पक्षाचा झेंडा फडकावण्याची शिवसेनेची दशकांहून अधिक काळ जुनी असलेली परंपरा यावर्षीही कायम राहिलीय. मुंबई महानगरपालिकेत एकूण २२७ जागा आहेत. नगरसेवकांद्वारे महापौर आणि उपमहापौरांची निवड केली जाते. सध्या, पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक म्हणजे ९४ तर भाजपचे ८३, काँग्रेसचे २९, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, सपाचे ६, मनसेचा १ तर एमआयएमचे २ नगरसेवक आहे. आहेत. २०१७ साली भाजपनं महापौर पदासाठी शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांना समर्थन दिलं होतं.