मुंबईतील पाणीकपातीबाबत BMCचा महत्त्वाचा निर्णय, दोन धरणातील राखीव पाणीसाठा...
Mumbai News Today: मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट असतानाच मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Mumbai News Today: मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार असतानाच मुंबई महापालिकेने एक दिलासादायक माहिती दिली आहे. सात धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळं संपूर्ण मुंबईत 10 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय मुंबई महापालिका घेत होती. पण त्याआधीच मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, ऊर्ध्व वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही धरणातील पाणी साठा कमी झाला आहे. या सात धरणांपैकी तुळशी, विहार, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा या पाच धरणांचा कारभार मुंबई महानगरपालिका पाहते. तर, भातसा आणि अप्पर वैतरणा या धरणांचा निर्णय राज्य सरकारचा असतो.
दरम्यान, यंदा ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने धरण भरली नव्हती. तसंच, यंदा धरणात केवळ 43 टक्केच पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी 7 धरणाचा पाणीसाठा ही 55 टक्के इतका होता. तर, यंदा पाणीसाठा कमी असल्याने मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले होते. पण आता राज्य सरकारने भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने राखीव पाणीसाठा वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळं मुंबईत पाणी कपात करण्याची गरज भासणार नाही, असं पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी म्हटलं आहे. भातसा आणि अप्पर वैतरणा या धरणाची देखरेख राज्य सपकार करते. दोन धरणांचे बांधकाम झाले तेव्हा भांडवली खर्चात मुंबई महानगरपालिकेने मदत केल्यामुळं या धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होतो.
दरम्यान, 1 मार्चपासून मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावले होते. राज्य सरकार राखीव पाणीसाठा देण्याच्या या निर्णयामुळं सध्या तरी हे संकट टळले आहे. मुंबईकरांवरील 10 टक्के पाणीकपात जरी टळली असली तरी 5 मार्चपर्यंत पाणीसंकट कायम असणार आहे. पिसे येथील उदंचन केंद्रात सोमवारी लागलेल्या आगीमुळे संपूर्ण मुंबईतच सरसकट 15 टक्के पाणी कपात लागू करावी लागणार आहे. या उदंचन केंद्रातील एक ट्रान्सफॉर्मर पूर्ण जळाल्यामुळे काही पंप बंद ठेवावे लागणारे आहेत.
5 मार्चपर्यंत पाणीकपात
5 मार्चपर्यंत शहरात 15 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण मुंबई शहरासह पश्चिम उपनगरं, पूर्व उपनगरं आणि ठाणे शहर, भिवंडी, नगर बाह्य विभागांना मुंबई 2 आणि 3 या जलवाहिन्यांतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये 15 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे.