मुंबई महापालिकेत आता, एक व्यक्ती, एक पद, एक वर्ष
या निवडणुकीसाठी एक व्यक्ती, एक पद, एक वर्ष असं नवं धोरण शिवसेनेनं स्वीकारलं आहे.
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिकेत लवकरच वैधानिक समित्यांच्या निवडणुका होणार असून, या निवडणुकीसाठी एक व्यक्ती, एक पद, एक वर्ष असं नवं धोरण शिवसेनेनं स्वीकारलं आहे. एवढंच नव्हे तर २०१९ हे निवडणुकीचं वर्ष असणार असल्यानं महापालिकेतील ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांकडं महत्वाच्या समित्यांची अध्यक्षपदं सोपवण्यात येणार आहेत. आतापर्यंत डावलण्यात आलेल्या मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांना अनुक्रमे शिक्षण आणि बेस्ट समिती अध्यक्षपद देण्यात येणाराय. तर ज्येष्ठ नगरसेवक यशवंत जाधव यांच्याकडे स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.
नव्या सभागृह नेत्याची निवड
स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर नव्या सभागृह नेत्याची निवड होणार आहे. विशाखा राऊत यांना हे पद मिळण्याची शक्यता आहे. भाजप सत्तेत सहभागी नसल्यानं सर्व वैधानिक समित्या शिवसेनेच्या वाट्याला आल्यात. त्यामुळं सेनेकडून अधिकाधिक नगरसेवकांची सोय लावली जात आहे. काँग्रेसनंही सर्व वैधानिक समिती अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचं ठरवल्याने शिवसेनेचे उमेदवार निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.