मुंबईकरांनो लक्ष द्या! रात्रभर फटाके फोडण्यावर निर्बंध, काय आहे BMC ची डेडलाइन?
Diwali 2024: दिवाळीच्या दिवसांत फटाके उडवले जातात. मात्र, यामुळं प्रदुषणातही वाढ होते. मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे.
Diwali 2024: दिवाळी म्हटलं की फटाके आलेच. मात्र, या दिवसांत हवेची गुणवत्ता खालावते. तसंच प्रदुषणातही वाढ होते. यामुळंच मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी दिवाळीत रात्री फक्त 10 वाजेपर्यंत फटके वाजवा, असे अवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवा आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी असे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय फटाके कमी आवाज करणारे, कमी प्रदूषण करणारेच वाजवावेत, असे आवाहनही पालिकेने केले आहे.
हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात हवेच्या प्रदुषणात वाढ होते. हिवाळ्यात तापमान कमी असल्याने वायुतील प्रदूषक हवेतील वरच्या थरात न जाता खालच्या थरात मिसळतात व खालीच राहतात. त्यामुळे सहसा हिवाळ्यातील वायू प्रदूषण सर्वाधिक असते. दिवाळीपासून थंडी सुरू होते. तसंच, दिवाळी हा जसा दिव्यांचा सण आहे तसंच या दिवसांत मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले जातात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून प्रदुषणात वाढ होत असल्याने हवेचा स्तर खालावला आहे. त्यामुळंच पालिकेने फटाके वाजवण्यावर निर्बंध आणले आहेत.
फटाक्यांच्या प्रदूषित हवेमुळे लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, दम्यासारख्या आजाराचे रुग्ण अशा सर्वांनाच आरोग्याचा त्रास होतो. त्यासोबतच पर्यावरणाचेदेखील नुकसान होते. यातच मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता ढासळल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. आता दिवाळीत मोठ्या प्रमाणात वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे ही समस्या गंभीर होण्याचा धोका आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईकरांना फटाके वाजवताना प्रदूषण टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
नियम काय आहेत?
- ध्वनी विरहित फटाक्यांना प्राधान्य द्यावे.
- कमीत कमी वायू प्रदूषण करणारे फटाके फोडावेत.
- तीव्र आवाजाचे फटाके फोडणे टाळावे.
- सुरक्षिततेस सर्वोच्च महत्त्व द्यावे.
- गर्दीची ठिकाणे, अरुंद गल्लीत फटाके फोडू नयेत.
- फटाके फोडताना मुलांसोबत मोठ्या व्यक्तींनी रहावे.
- पाण्याने भरलेली बादली, वाळू आदी जवळ ठेवा.
- कोरडी पाने, कागद किंवा इतर सामुग्री जाळू नये.