मुंबई : मराठी भाषेतील फलक नसलेल्या महानगरांतील दुकानांवर बीएमसी 10 जूननंतर कारवाई सुरु करणार आहे. बीएमसीने मुंबईतील सर्व दुकाने आणि आस्थापनांना कॅपिटल मराठी अक्षरात नाव लिहिण्याचे निर्देश दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी पाट्यांसाठी दिलेली मुदत 31 मे रोजीच संपली आहे. पण, 1 जूनपासून कारवाई न करता बीएमसीने दुकानदारांना मराठीत बोर्ड बदलण्यासाठी आणखी काही कालावधी दिला आहे.


दुकानांच्या पाट्या मराठीत लावण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या, मात्र अजूनही फलकांची नावे इंग्रजीतच आहेत. बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दुकानदारांना ही शेवटची संधी देण्यात आली आहे. यानंतर बीएमसी कठोर कारवाई करेल. सुरुवातीला बीएमसीचे मुंबईत 4.5 लाख दुकानांचे लक्ष्य असेल, ज्यामध्ये शोरूम, स्टोअर्स आणि मोठी दुकाने यांचाही समावेश असेल.


नकार दिल्यास कायदेशीर कारवाई 


दुकाने आणि आस्थापने मराठीत फलक लावत आहेत की नाही, याची प्रत्येक प्रभागात तपासणी केली जाईल, असे पालिकेचे उपायुक्त संजोग काबरे यांनी सांगितले. यासाठी 75 निरीक्षक आहेत. याशिवाय त्यांच्यासोबत आणखी एक अधिकारी उपस्थित राहणार आहे. तपासणीदरम्यान दुकानदाराने मराठी फलक लावण्यास नकार दिल्यास त्याच्यावर न्यायालयीन कारवाई करण्यात येईल. दुकानदाराला न्यायालयीन कारवाई टाळायची असेल तर त्याला दंड भरावा लागेल. याअंतर्गत दुकानात काम करणाऱ्या प्रति व्यक्ती 2,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.


दारूच्या दुकानावरुन महापुरुषांची नावे हटवावी लागणार


मुंबईतील दारूच्या दुकानांच्या फलकावर महापुरुषांची किंवा किल्ल्यांची नावे लिहिण्यास पालिकेने बंदी घातली आहे. या दुकानांमधून महापुरुष आणि किल्ल्यांची नावे 10 जूनपर्यंत हटवावी लागणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर न्यायालयीन कारवाई केली जाईल, असा इशारा बीएमसीने दिला.


बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईतील ज्या दारूच्या दुकानावर महापुरुष किंवा किल्ल्यांची नावे आहेत, त्यांना नाव बदलावे लागेल. नावे बदलण्यासोबतच महापुरुषांच्या नावावर नवीन नाव ठेवण्यासही बीएमसीने बंदी घातली आहे.