Rs 80 Lakh Car Stolen Actress Shilpa Shetty Connection: अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे पुन्हा एका नव्या वादात अडकले आहेत. आता हे दोघे वादात आडकण्यासाठी कारणीभूत ठरलं आहे त्यांच्या मालकीचं 'बॅस्टीअन' हे हॉटेल! झालं असं की या हॉटेलच्या पार्किंग लॉटमधून एक आलिशान गाडी चोरीला गेली आहे. या कारची किंमत तब्बल 80 लाख रुपये इतकी आहे. शिल्पा आणि राज यांच्या मालकीच्या हॉटेलच्या पार्किंग लॉटमधून बीएमडब्यू झेड फोर ही आलिशान कार चोरीला गेल्याचं उघड झालं आहे. बरं ही कार कोणाच्या मालकीची आहे याचा तपशीलही समोर आला आहे. 


शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, 'बॅस्टीअन'च्या पार्किंग लॉटमधून रुहान खान नावाच्या व्यक्तीची आलिशान बीएमडब्यू झेड फोर कार चोरीला गेली आहे. 34 वर्षीय रुहान खान हा एक उद्योजक आहे. "आपली कार पार्किंग लॉटमधून चोरीला गेल्याचं समजल्यानंतर त्याला धक्का बसला," असं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे. दादरमधील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार हा 27 ऑक्टोबर रोजी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटेच्या वेळी घडल्याची माहिती समोर आली आहे. 


कार पार्क करुन चावी...


उद्योगपती रुहान खान यांनी केलेल्या आरोपानुसार हॉटेलच्या बेसमेंटमधून कार चोरीला गेली. रुहान खान यांनी आपण आपल्या गाडीची चावी व्हॅले स्टाफकडे दिली होती. कार पार्क करण्याची तसेच हॉटेलच्या दाराशी आणून देण्याची जबाबदारी व्हॅले पार्क करणावर. मात्र व्हॅले पार्किंग करणाऱ्याकडे कार पार्क केल्यानंतर चावी दिल्यानंतरही ही कार चोरीला गेल्याचा रुहान खान यांचा आरोप आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुहान खान आणि त्यांचा एक मित्र रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये आले होते. कार पार्क केल्यानंतर त्यांनी चावी हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ व्हॅलेचं काम करणाऱ्या व्यक्तीकडे दिली. हे हॉटेल पहाटे चार वाजता बंद होतं. त्यावेळेस बाहेर पडलेल्या रुहान खान यांनी व्हॅलेकडे कारची चावी मागितली असता, दोन अनोळखी व्यक्ती आधीच कारची चावी व्हॅलेकडून घेऊन कार तिथून घेऊन गेल्याचं स्पष्ट झालं. 


नेमकं घडलं काय?


रुहान खान यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये, "बराच वेळ मी कारबद्दल विचारणा केल्यानंतर त्यांनी मला तुम्ही पार्क केलेल्या ठिकाणी तुमची कार दिसत नसल्याचं सांगितलं," असा उल्लेख आहे. त्यानंतर सीसीटीव्हीमध्ये दोन अनोखळी व्यक्ती एका वेगळ्याच कारमधून आल्या आणि रुहान खान यांची कार घेऊन गेल्याचं दिसून आलं. सध्या पोलीस या चोरांचा शोध घेत आहेत.


यापूर्वीही अडचणीत आलेत शिल्पा आणि राज


मात्र अशाप्रकारे शिल्पा आणि राज हे अडचणीत अडकल्याचं पहिलच प्रकरण नाही. यापूर्वी या दोघांनी इतरांच्या मदतीने गुंतवणुकदारांना सोने तारण योजनेच्या नावाखाली फसवल्याचे आरोप झाले आहेत. जून महिन्यामध्ये या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. पी. मेहता यांनी, "हा दखल पात्र गुन्हा आहे," असं निरिक्षण नोंदवलं. सत्य युग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीच्या माध्यमातून फसवणूक झाली. या प्रकरणामध्ये शिल्पा आणि राज यांच्याबरोबरच या कंपनीचे निर्देशक आणि सर्व कर्मचाऱ्यांवरही ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये चौकशीनंतर तक्रारदाराला त्याचे संपूर्ण 90 लाख रुपये देण्यात आल्याचं उघड झालं.