मुंबई : शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी निघालेली बोट बुडून सिद्धेश पवार नावाच्या चार्टर्ड अकाऊंटंट तरूणाचा जीव गेला. नेमका कुणी घेतला सिद्धेशचा बळी? सरकारी कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनानं? की स्मारकांच्या जीवघेण्या राजकारणानं ? नेत्यांचं मतपेट्यांचं राजकारण रंगतं, पण त्यात बळी जातो तो सिद्धेशसारखा निष्पाप तरूण.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवस्मारक पायाभरणी कार्यक्रम बोट अपघाताचे हे आहे खरं कारण?


हाताशी आलेल्या, ऐन उमेदीत असलेल्या आपल्या पोराची काय चूक होती, असा प्रश्न सिद्धेश पवारच्या कुटुंबीयांना पडलाय. सिद्धेत मुळचा कोकणातील. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याचा रहिवासी. परिस्थितीशी झगडून सिद्धेश सीए झाला. आता सगळं चांगलं होईल, ही आशा असलेल्या पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. सिद्धेशच्या मृत्यूला जबाबदार कोण ? खडकावर आदळलेली बोट. नवशिक्या बोटचालक? योग्य नियोजन न करणारे अधिकारी? लाइफ जॅकेट्स न पुरवणारे कर्मचारी? २५ मिनिटं मदत न पोहचवणारी यंत्रणा ? की राजकीय फायद्यासाठी कशाचाही इव्हेण्ट करण्याचा अट्टाहास करणारी राजकीय नेतेमंडळी ? कोणी घेणार आहे का सिद्धेशच्या मृत्यूची जबाबदारी ?



स्मारकांचं राजकारण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही नवं नाही. किती वर्ष हे असंच चालणार आहे, आणि आपण हे किती वर्ष सहन करणार आहोत ? अनेक प्रश्न भिजत पडलेले असताना कोट्यव़धींच्या स्मारकांचा हा डामडौल कुणाला हवाय..? कोणाचं स्मारक उंच यावर आपण किती अट्टाहास करणार? शिवस्मारकाच्या पायाभरणीचा एक सोहळा पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेला असताना, पुन्हा कालचा इव्हेण्ट घडवण्याची गरज होती का. यावरही राजकारण होईल, पण सिद्धेश परतणार नाहीच.


कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्यापेक्षा शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गड किल्ल्यांचं संवर्धन करता येणार नाही का ? रायगडावर पिण्याचं पाणी नाही, सिंहगडाचे बुरुज ढासळत आहेत, तर राजगडाकडे दुर्लक्ष होतय. जलदुर्गांचीही उपेक्षा होतोय. ऐतिहासिक स्फूर्तीस्थानं असलेल्या गडकोटांची ही अशी दूरवस्था होतेय. ही जिवंत स्मारकं आहेत.. ती जपली तर शिवाजी महाराजांचं कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचेल. गरज आहे ती सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकीय इच्छाशक्तीची महाराजांचे नाव घेवून केवळ राजकारण करण्यापेक्षा त्यांचे आदर्श जनतेपर्यंत पोहचायला हवेत, हे सगळ्यांना कधी समजणार ?