मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : संभाजीनगरमध्ये एका व्यक्तीने कोरोना लसीच्या दुष्परिणामांमुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. मुलीच्या मृत्यूबाबत त्यांनी मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेत नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्याप्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई हायकोर्टाने डॉ. स्नेहल लुनावत यांच्या मृत्यूबाबत वडील दिलीप लुनावत यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेतली आहे. याप्रकरणी मुंबई हायकोर्टने सीरम इन्स्टिट्यूट (serum institute), मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates), केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे. दरम्यान, बिल गेट्स यांची बाजू मांडणाऱ्या वकिलाने ही नोटीस स्वीकारली आहे


कोविड लसीच्या दुष्परिणामांमुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याची दावा करत दिलीप लुनावत यांनी मुलीच्या मृत्यूबद्दल 1000 कोटी रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी केली होती. यासंदर्भातील याचिका त्यांनी हायकोर्टात दाखल केली होती.


याचिकेत फेसबुक, यूट्यूब, गुगल यांसारख्या सोशल मीडिया आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांवर कारवाई करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.  या माध्यमांतून लस पूर्णपणे सुरक्षित आहे असा दावा करण्यात आला होता. तसेच त्यामध्ये लसींचे दुष्परिणाम या बाबतची माहिती दडपवण्यात आली होती असा दावा करण्यात आला आहे. न्यायमूर्ती गंगापूरवाला आणि माधव जामदार यांचा समावेश असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या याचिकेची दखल घेतली. 


याचिकाकर्ते दिलीप लुनावत यांनी दावा केला होता की त्यांची मुलगी स्नेहल हिला लसीचे दोन्ही डोस फ्रंन्ट लाईन वर्कर म्हणून देण्यात आले होते. याचिकेत म्हटले आहे की स्नेहलला आश्वासन देण्यात आले आहे की कोविड लस पूर्णपणे सुरक्षित आहे आणि शरीराला कोणताही धोका नाही.


याचिकाकर्त्याने दावा केला आहे की ती आरोग्य सेविका असल्याने तिला महाविद्यालयात लस घेण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यांनी सांगितले की त्यांच्या मुलीने 28 जानेवारी 2021 रोजी लस घेतली आणि 1 मार्च रोजी त्या लसींच्या दुष्परिणामांमुळे तिचा मृत्यू झाला.