वरळी सी फेसवर सेल्फी घ्यायच्या नादात तरुणानं गमावला जीव
समुद्र किनाऱ्यावर सेल्फी घ्यायच्या नादात आणखी एका तरुणाला आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. मुंबईच्या वरळी सी फेसवर ही घटना घडलीय.
मुंबई : समुद्र किनाऱ्यावर सेल्फी घ्यायच्या नादात आणखी एका तरुणाला आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. मुंबईच्या वरळी सी फेसवर ही घटना घडलीय.
१८ वर्षांचा योगेश गवळी हा तरुण सिद्धार्थ नगरचा रहिवासी होता. बुधवारी आपल्या एका मैत्रिणीसोबत योगेश वरळीच्या समुद्रकिनाऱ्यावर उसळत्या लाटांचा आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी आला होता. याच दरम्यान ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्राला भरतीनं उधाण आलं असताना योगेश उसळत्या लाटांची मजा लुटण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर गेला. समुद्राच्या मोठाल्या लाटांसोबत सेल्फी घ्यायचा तो प्रयत्न करत होता. यामुळे त्याला धोक्याचा अंदाज आला नाही.
सेल्फी घेत असतानाच आलेल्या एका भल्या मोठ्या उसळत्या लाटेनं योगेश समुद्रात ओढला गेला. तात्काळ याची सूनचा पोलीस आणि अग्निशमन दलाला मिळाली... परंतु, मदत पोहचेपर्यंत उशीर झाला होता.
पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केलीय. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीही प्रीती भिसे नावाच्या एका तरुणीला सेल्फी घेताना मरीन ड्राइव्हवच्या किनाऱ्यावर आपले प्राण गमवावे लागले होते.