Bride stuck in lift at Bhayander : प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : लग्नाचा मुहूर्त जवळ येत असतानाच नवरी मुलगी लग्न मंडपात पोहोचण्याऐवजी लिफ्टमध्येच अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, नववधु लग्नमंडपात न आल्याने चर्चा सुरु झाली. लग्नमंडपात एकच गोंधळ झाला. तिचा शोध घेतला असता ती लिफ्टमध्ये अडकल्याचे समोर आले. त्याचवेळी लग्नाचा मुहूर्त जवळ आल्याने दोन्ही कुटुंबाचा जीव टांगणीला लागला होता.बराचवेळ लिफ्टमध्ये अडकल्याने नवरी मुलीला मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, वीस मिनिटांनी सुटका झाल्यानंतर सुटकेचा श्वास सोडला.  तिच्यासोबत काही जण होते. यात एका लहान मुलाचाही समावेश होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवरी मुलगी लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती मीरा भाईंदर पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून नववधू आणि तिच्या सोबत अडकलेल्या मंडळींची सुखरुप सुटका केली. भाईंदर येथे राहणार्‍या प्रिती वागळे या तरुणीचे सोमवारी लग्न होते. भाईंदर पश्चिमेच्या राई येथील विनायकनगर येथील सभागृहात लग्न सोहळा सुरु होता. रात्री 9 चा मुहूर्त होता. सगळे जण वधूची वाट बघत होते. तयारी करुन रात्री सव्वा आठच्या सुमारास नवरी मुलगी आपल्या तीन बहिणी आणि दोन लहान बाळासोबत तळमजल्यावरुन पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी निघाली. मात्र अचानक लिफ्ट बंद पडली.



लग्नाच्या मुहूर्ताचा वेळ जवळ आला असताना सगळे नवरीच्या मंडपात येण्याची वाट बघत होते. मात्र ऐनवेळी लिफ्ट बंद पडल्याने नवरी मुलगी, तिच्या तीन बहिणी आणि लहान मुलं लिफ्टमध्ये अडकली. त्यामुळे सर्वांची चांगलीच धावपळ उडाली. एकीकडे लिफ्टमध्ये अडकल्याचा प्रसंग तर दुसरीकडे लग्नाचा मुहूर्त चुकण्याची भीती असल्याने दोघांच्या कुटुंबीयांचा जीव टांगनीला होता. मात्र या घटनेची माहिती अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून अवघ्या 20 मिनिटात सर्वांची सुटका केली आणि दोघांचा लग्न सोहळा व्यवस्थित पार पडला. मात्र एक लिफ्ट एनवेळी बंद पडल्याच्या घटनेने साऱ्यांचीच चिंता वाढली होती.