युपीतली लोकं खूप महान! राज ठाकरे यांचा दौरा स्थगित झाल्यावर बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित, दौऱ्याला विरोध करणारे बृजभूषण सिंह म्हणतात...
मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा नियोजित अयोध्या (Ayodhya) दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे 5 जूनला अध्योध्येला जाणार होते. खुद्द राज ठाकरे यांनीच ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. राज ठाकरे यांची तब्येत ठीक नसल्याने दौरा रद्द झाल्याचं सांगितलं जात आहे. पुण्यातील सभेमध्ये राज ठाकरे यावर सविस्तर बोलणार असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं आहे.
मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली होती. ट्रेनही बुक करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या दौऱ्याला उत्तरप्रदेशचे भाजप (BJP) खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी जोरदार विरोध केला होता. राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येत पाय ठेवावा अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली होती. त्यानंतर हा दौरा आणखीनच चर्चेत आला.
बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया
आता राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर बृजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी माफी न मागून उत्तर भारतीयांचा आणखीन अपमान केल्याचं बृहभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. दौरा स्थगित करणं हा आमचा विजय नसल्याचं ते म्हणालेत.
राज ठाकरे हे खूप दुर्भाग्यशाली व्यक्ती आहेत, त्यांच्याकडे संधी होती, पण ती त्यांनी गमावली. त्यांनी जर उत्तर भारतीयांची, योगी आदित्यानाथ यांची आणि मोदींजी माफी मागितली असती तर इथल्या लोकांचा राग शांत झाला असता, उत्तर प्रदेशची लोकं खूप महान आहेत असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं.
माफी न मागितल्याने राज ठाकरे यांनी जखमेवरची खपली काढली आहे. राज ठाकरे यांचा दौरा स्थगित झाला असला तरी माझे 5 जूनचे कोणतेही कार्यक्रम रद्द होणार नाहीत, आम्ही पाच जून रोजी अयोध्येमध्ये शरयू नदीत स्नान करणार आहोत. तेथील साधू-संतांसोबत आम्ही पूजा-पाठही करणार आहोत, असंही बृजभूषण सिंह यांनी स्पष्ट केलं.