Budget 2024 : बातमी पैशांची! यंदाच्या वर्षातील दुसरं बजेट शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना फळणार की...?
Budget 2024 : शेअर बाजारात अर्थसंकल्पाची घोषणा होण्याआधीच अनेक हालचालींना वेग आला असून, आता निर्मला सीतारमण नेमक्या कोणत्या घोषणा करतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2024 मध्ये पुन्हा एकदा अर्थसंकल्प सादर करणार असून, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपप्रणित एनडीए सरकारचा हा तिसरा आणि तितकाच महत्त्वाचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाकडून सध्या प्रत्येक वर्गाच्या अनेक अपेक्षा असून, येत्या काळात अर्थसंकल्पामधील घोषणांचा शेअर बाजारावरही परिणाम होताना दिसणार आहे.
अनेक कंपन्यांकडून जारी करण्यात येणारी तिमाही निकाल, जीडीपीची आकडेवारी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये होणाचे चढ- उतार या साऱ्यामुळं शेअर बाजारातील गुंतवणुकीवर आणि गुंतवणुकदारांवरही याचे परिणाम दिसून येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
शेअर बाजाराच्या बाबतीत सांगायचं झालं, तर अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वीचा आठवडा गुंतवणुकदारांसाठी चांगला आणि फायद्याचा होता. पण, आठवड्याअखेरीस मात्र मायक्रोसॉफ्टमध्ये आलेला बिघाड सारी गणितं बिघडवताना दिसला. शेअर बाजारातील जाणकारांच्या माहितीनुसार मंगळवारी अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आकड्यांमध्ये मोठी उसळी पाहायला मिळून अर्थसंकल्प आणि त्यानंतरच्या वातावरणामुळं अर्थव्यवस्थेला चांगली गती मिळू शकते. या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारमण या नेमक्या कोणत्या घोषणा करतात आणि कोणत्या क्षेत्राकडे त्यांचं झुकतं माप दिसतं या निकषांवरही शेअर बाजारातील घडामोडी अवलंबून असणार आहेत.
हेसुद्धा वाचा : Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय? इकोनॉमिक सर्व्हे महत्त्वाचा का असतो?
2023 मध्ये काय होती शेअर बाजारातील परिस्थिती?
2023 मधील अर्थसंकल्पावेळी शेअर बाजारात चांगला उत्साह पाहायला मिळाला होता. जिथं अमेरिकी शॉर्ट सेलर कंपनी, हिंडनबर्ग (Hindenburg) च्या अहवालाचा परिणाम पाहायला मिळाला होता. गौतम अदानी यांच्या उद्योगसमूहासंदर्भात झालेल्या गौप्यस्फोटांनंतर हे परिणाम पाहायला मिळाले होते. असं असलं तरीही 1 फेब्रुवारी 2023 ला BSE Sensex 1223 अंशांनी उसळी घेत 60773 वर पोहोचला होता. त्या दिवशी सेन्सेक्स 59708 अंकांवर बंद झाला होता. तर, निफ्टी 46 अंकांनी घसरून 17616.30 वर बंद झाला होता. आता यंदाच्या संपूर्ण अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर कोणाला गुंतवणुकीचा फायदा होतो आणि कोणाला फटका बसतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.