मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी अत्यंत अश्लाघ्य भाषा वापरली आहे. संभाजी भिडे सातत्याने महापुरुषांबद्दल अवमानकारक विधाने करत असतात पण भाजपा (BJP) सरकार त्यांच्याविरोधात कारवाई करत नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे.  भाजपाला संभाजी भिडेच्या माध्यमातून मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा आहे का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस  कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक लिखाण केल्याचा मुद्दा विधानसभेत चर्चेत आला त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रवृत्तींच्या फक्त मुसक्या आवळून चालणार नाही तर अशांना फाशी लावली पाहिजे असं म्हटलं होतं. देवेंद्र फडणवीस आता संभाजी भिडेंना फाशी देणार का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातही संभाजी भिडेंचा हात होता पण अजून ते मोकाटच आहेत. भारतीय जनता पक्षाचे सरकार संभाजी भिडेंवर एवढे मेहबानी कशासाठी दाखवत आहे ?. संभाजी भिडे, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे संबंध सर्वांना माहित आहेत, भारतीय जनता पक्षाने भिडें संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. 


संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने अधिवेशनात लावून धरली आहे. राज्य सरकारने भिडेंना अटक करुन कडक शिक्षा ठोठावण्याची काँग्रेस प्रतिक्षा करत आहे. अधिवेशनाला चार दिवसांची सुट्टी आहे पण कारवाई झाली नाहीतर सुट्टीनंतर अधिवेशनात काँग्रेस पक्ष संभाजी भिडें प्रश्नी सरकारला धारेवर धरेल. जोपर्यंत संभाजी भिडेंना अटक करुन कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही, असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला.


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा संभाजी भिडेंनी अवमान केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाने आज राज्यभर तीव्र आंदोलन केलं. ठिकठिकाणी संभाजी भिडेंचा पुतळा जाळून आणि त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. अमरावतीमध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. 


कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध आंदोलन करण्यात आलं. धुळ्यात  प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शाम सनेर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुणे, सातारा, शिंदेवाही, बुलढाणा, य़वतमाळ, मोताळा, जळगाव जामोद सह राज्यभर आंदोलन करण्यात आलेी.