गोरगरीबांसाठी ₹200000000000 देणार `हा` उद्योजक! म्हणाला, `टाटांकडून प्रेरणा घेऊन...`
Rs 20000 Crore For Social Work: भारतामधील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या या कंपनीने आपल्या उत्पनातील एक पंचमांश वाटा हा समाज सेवेसाठी देण्याचा निर्धार केला आहे. ही कंपनी कोणी आणि त्यांनी काय म्हटलंय जाणून घ्या...
Rs 20000 Crore For Social Work: बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील देशातील आघाडीच्या लिस्टेड कंपन्यांपैकी एक असलेल्या मार्कोटेक डेव्हलपर्ससंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व सामान्यांच्या ओळखीच्या असलेल्या 'लोढा ग्रुप'चे प्रमोटर्स त्यांच्या वाट्याचा मार्कोटेक डेव्हलपर्समधील मोठा हिस्सा लोढा समुहाच्या ना नफा ना तोटा तत्वावर चालणाऱ्या लोढा फिलॉन्थ्रॉफी फाऊंडेशनला देणार आहेत. यापैकी पहिला हिस्सा हा तब्बल 20 हजार कोटी रुपयांचा म्हणजेच अमेरिकी डॉलर्समध्ये सांगायचं झालं तर 2.5 बिलियन अमेरिकी डॉलर्स इतका आहे. विशेष म्हणजे हा निर्णय टाटा समुहापासून प्रेरणा घेऊन घेतल्याची माहिती लोढा समुहाचे व्यवस्थापकीय निर्देशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या अभिषेक लोढा यांनी दिली आहे.
टाटांकडून घेतली प्रेरणा
अभिषेक लोढा यांनी टाटा कुटुंबाने एका शतकापूर्वीच त्यांच्या उद्योगामधील मोठी हिस्सेदारी ही टाटा ट्रस्टच्या नावे केली होती. त्यामधूनच प्रेरणा घेत आम्ही हा निर्णय घेतला आहे, असं सांगितलं. "या भेटीचा भारतावर होणारा मोठा परिणाम आणि टाटा ट्रस्टच्या माध्यमातून होत असणारं उत्तम काम या दोन गोष्टींमुळे हा मला निर्णय घेण्याची प्रेरणा मिळाली," असं अभिषेक यांनी जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये नमूद केलं आहे.
अधिक आर्थिक स्रोत उपलब्ध होतील असा विश्वास
"माझे वडील मंगल प्रभात लोढा आणि आई मंजू लोढा यांच्या आशिर्वादाने तसेच माझी पत्नी विनिता लोधा तसेच माझ्या मुलाच्या पाठिंब्याने, मी हे जाहीर करतो की लोढा फिलॉन्थ्रॉफी फाऊंडेशन ही संस्था आता देशातील सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी असलेल्या मार्कोटेक डेव्हलपर्समध्ये एक पंचमांश हिस्स्याची वाटेकरी असेल. भविष्यात लोढा समूह अजून वाढणार आहे. त्यामुळेच लोढा फिलॉन्थ्रॉफी फाऊंडेशनकडे आमचं 'चांगलं काम करा, उत्तम करा' हे धोरण राबवण्यासाठी अधिक आर्थिक स्रोत उपलब्ध असेल," असं अभिषेक यांनी जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.
कोणत्या क्षेत्रात काम करते लोढा फिलॉन्थ्रॉफी फाऊंडेशन ही संस्था?
लोढा फिलॉन्थ्रॉफी फाऊंडेशनमधील संपूर्ण कमाई आणि संपत्ती ही राष्ट्रासाठी आणि सामाजिक कामांसाठी देण्यात आली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रामुख्याने महिला, मुलं, पर्यावर आणि भारतीय संस्कृती या चार श्रेत्रांमध्ये समाज उपयोगी कामं केली जातात.
मायक्रोटेक डेव्हलपर्सचं बाजार मूल्य
मायक्रोटेक डेव्हलपर्स ही कंपनी बांधकाम व्यवसाय क्षेत्रामध्ये मुंबई आणि उपनगरांबरोबरच पुणे आणि बंगळुरुमध्ये कार्यरत आहे. या कंपनीचं बाजार मूल्य हे 1.1 लाख कोटी रुपये इतकं आहे.