मुंबई : भायखळा आणि मुंबादेवी हा मुस्लीम बहुल मतदारसंघ आहे. त्यामुळे येथील मतांवर देखील शिवसेनेचा डोळा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन माजी नगरसेवक शिवसेनेत घेत येथील मतं मिळवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2014 च्या निवडणुकीत थोड्या मतांनी येथे शिवसेनेचा पराभव झाला होता. त्यामुळे शिवसेनेने आता मुस्लीम बहुल भागातही लक्ष केंद्रीत केलं आहे. पण प्रत्यक्षात शिवसेनेला याचा किती फायदा होतो हे निवडणूक निकालानंतरच कळेल.


काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जमसुटकर यांची पत्नी सध्या विद्यमान काँग्रेसच्या नगरसेविका असून त्यांचा प्रभाव मुंबादेवी आणि भायखळा मतदारसंघावर असल्यामुळे त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील यांचा भेंडीबाजार या परिसरात अल्पसंख्यांक मतदारावर प्रभाव असल्यामुळे त्यांनाही शिवसेनेत घेण्यात आलं.


शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी शिवसेनेनं विरोधी पक्षातील नेत्यांना शिवसेनेत खेचण्याचा धडाका लावला आहे. मतदान काही दिवसांवर असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शिवसेनेने धक्का दिला आहे. वरळी मतदारसंघात येणाऱ्या भायखळ्यातले काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर आणि राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुनिता शिंदेंनी आणि माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 


विशेष म्हणजे पहिल्यांदाच मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीत आणि आदित्य ठाकरेंच्या खास उपस्थितीत इतर पक्षातील नेत्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. जामसुतकर यांच्या पत्नी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आहेत.