अमित जोशी, झी २४ तास, मुंबई : राज्यात सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतेय. मात्र याआधीच मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार, हे आता निश्चित झालंय. रविवारी, १६ जून रोजी सकाळी ११ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी राजभवनात पार पडणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाईलाही एक जागा मिळणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यातर्फे स्पष्ट करण्यात आलंय. 


अतुल सावे आणि अनिल बोंडे यांचा समावेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे भाजपाचे आमदार अतुल सावे तसंच मोर्शीचे भाजपाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांचा समावेश निश्चित असल्याची माहिती मिळतीये.


रिपाईंच्या महातेकर यांचा समावेश


या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर हेदेखील मंत्रिपदाची शपथ घेतील. त्यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे महातेकर यांचे नाव अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविले असल्याचं, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षातर्फे एक नाव देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास केल्यानंतर अविनाश महातेकर यांच्या नावाची शिफारस पाठविली असल्याची माहिती आठवले यांनी दिलीय. यावेळी, दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारदेखील मानलेत.



या पाच जणांना डच्चू?


मंत्रिमंडळ फेरबदल करताना भाजपमध्ये काही जणांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपच्या पाच दिग्गजांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रवीण पोटे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, गडचिरोली पालकमंत्री अंबरीश आत्राम यांना डच्चू मिळणार असल्याचं समजतंय. त्यामुळे आता संध्याकाळपर्यंत कोण-कोण राजीनामा देणार? याकडे सगळ्यांचच लक्ष लागून राहिलंय.