मुंबई : राज्यात  कोरोनामुळे पोलिसांवरचा ताण वाढल्याने आता त्यांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाला पाचारण करण्यात येणार आहे. राज्य सरकारने केंद्राकडे तशी मागणी केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात लष्कराला पाचारण केले जाईल अशी चर्चा होती, ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच फेटाळून लावली होती. पण कोरोनामुळे ताण आल्याने थकलेल्या पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या मागवल्या जातील असे संकेत त्यांनी दिले होते. त्यानुसार निमलष्करी दलाच्या 20 कंपन्या राज्यात पाचारण करण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.


राज्यात कोरोनामुळे पोलीस अहोरात्र काम करत आहेत. त्यातच रमझानही येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायची आहे. त्यामुळे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्या म्हणजे दोन हजार जवानांना राज्यात तैनात करावे अशी मागणी केंद्राकडे केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.


राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांनाच कोरोना झाल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत आठ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्युही झाला आहे. त्यामुळे थकलेल्या पोलिसांना विश्रांतीचीही गरज आहे. म्हणूनच पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रातील निमलष्करी दलाला पाचारण करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.


केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाला तैनात केल्याने मुंबईसारख्या शहरात विनाकारण वर्दळ असलेल्या ठिकाणी लोकांच्या फिरण्याला आळा बसेल, तसेच कायदा आणि सुव्यवस्थाही कठोरपणे राखली जाईल, अशी अपेक्षा आहे.


 



राज्यात कोरोनाचे गांभीर्य लक्षात न घेता मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना आळा घालण्यासाठी लष्कराला पाचारण करावे अशी चर्चा सुरु होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची शक्यता फेटाळली होती. पण मोकाट नागरिकांना आवरायचे असेल आणि कोरोनाचे संकट हाताबाहेर जाऊ द्यायचे नसेल तर निमलष्करी दलाला पाचारण करणे गरजेचे आहे. त्यातच पोलिसांवर मोठा ताण पडल्याने त्यांनाही विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने अखेर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाला राज्यात पाचारण करण्याचा निर्णय घेतला आहे.