CBI Case Against Sameer Wankhede: वादग्रस्त ड्रग्स प्रकरणामध्ये लाच मागितल्याच्या आरोपामध्ये नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीचे माजी विभागीय प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) अडचणीत आले आहेत. मात्र वानखेडे अचानक अडचणीत येण्यामागील मुख्य कारण आहे अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर (SRK manager) पूजा दादलानीने (Pooja Dadlani) नोंदवलेला जबाब. पूजा दादलानाने दिलेल्या जबाबाच्या आधारेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखा म्हणजेच सीबीआय़ने 2021 च्या या प्रकरणामध्ये वानखेडेंबरोबरच अन्य 4 जणांविरोधात भ्रष्टाचाराची केस दाखल केली आहे. मागील वर्षी 16 जून रोजी सोपवण्यात आलेल्या एनसीबीच्या व्हिजेलन्स रिपोर्टमध्ये पूजा दादलानीच्या जबाबाचा समावेश होता. याच जबाबाच्या आधारे सीबीआयने वानखेडे आणि अन्य 4 जणांविरोधात तपास सुरु केला आहे.


18 कोटींना सौदा ठरला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. या प्रकरणामध्येच पूजा दादलानीचा जबाब महत्त्वाचा असल्याचं प्रमुख कारण म्हणजे तिने सोपवलेली एक बॅग. वानखेडेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या छापेमारीनंतर काही तासांमध्येच दादलानी यांनी 50 लाख रुपये कॅश असलेली बॅग. एनसीबीच्या दाव्यानुसार सुरुवातीला या प्रकरणामध्ये खंडणी मागताना 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली. मात्र त्यानंतर 18 कोटी रुपयांमध्ये सौदा ठरला. याचसंदर्भातील टोकन अमाऊंट म्हणून 50 लाख रुपये कॅश सोपवण्यात आले होते. ही कॅश सोपवण्याचं काम पूजा दादलानीनेच केलं होतं. त्यामुळेच तिचा जबाब अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.


पूजा दादलानीने जबाबामध्ये काय म्हटलं होतं?


यापू्र्वी शाहरुखची मॅनेजर असलेल्या पूजा दादलानीला पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी 3 वेळा समन्स पाठवले होते. मात्र तिने या समन्सकडे दुर्लक्ष केलं होतं. 3 ऑक्टोबर 2021 रोजी या ड्रग्ज प्रकरणातील छापेमारीनंतरच्या पहिल्या काही तासांमध्ये नेमकं काय घडलं होतं याबद्दलचा जबाब पूजाकडून पोलिसांना नोंदवून घ्यायचा होता. मात्र पूजाने सहकार्य न केल्याने वानखेडेंविरुद्धचा तपास तेव्हा बंद करावा लागला. या तपासामध्ये सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार व्हिजिलन्स टीमने 2022 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये पूजा दादलानीशी संपर्क केला. त्यानंतर पोलिसांनी या खंडणी प्रकरणामध्ये पूजाचा जबाब नोंदवून घेतला. तसेच या प्रकरणातील सनविले डिसोझा, प्रभाकर सेल आणि पी. गोसावी या तिघांचेही जबाब नोंदवून घेतले होते.  मात्र पूजा दादलानीने आपल्या जबाबामध्ये नेमकं काय सांगितलं याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. सर्व जबाबांच्या आधारे शाहरुख खान करुन पैसे मिळवण्याचा प्रयत्न या छापेमारीनंतर करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. याचसंदर्भात सीबीआयने मागील आठवड्यात वानखेडेंबरोबरच इतर 4 लोकांविरोधात प्राथमिक गुन्हा दाखल केला आहे. "या प्रकरणाचा तपास करणारी सीबीआयटी टीम पूजा दादलानीचा पुन्हा एकदा जबाब नोंदवू शकते. यावेळेस पूजा दादलानी सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे," असं तपास अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं.


18 कोटींपैकी 8 कोटी वानखेडेंना


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणामधील प्रमुख दुवा असलेल्या प्रभाकर सेलचा 2022 मध्ये मृत्यू झाल्याने तपासाला मोठा धक्का बसला. मात्र प्रभाकर सेल हा आपल्या जबाबावर शेवटपर्यंत कायम राहिला. गोसावाने फोनवर बोलताना डिसोझाकडे आर्यनचं नाव न घेण्यासाठी शाहरुख खानकडून 25 कोटी रुपये मागितल्याचं ऐकलं होतं, असलं प्रभाकर सेलने सांगितलं होतं. शेवटी 18 कोटी रुपयांना सौदा ठरला होता. प्रभाकर सेलने केलेल्या दाव्यानुसार, या 18 कोटींपैकी 8 कोटी रुपये वानखेडेंसाठी होते असं गोसावीने डिसोझाला सांगितलं होतं. प्रभाकर सेल आणि गोसावी हे डिसोझा, दादलानी आणि तिच्या पतीला रात्री लोअर परेलमध्ये भेटले होते असं सांगितलं जातं. यावेळेसच दादलानीने कॅश भरलेली बॅग यांना दिलेली असा दावा करण्यात आला. 


17 जणांना अटक


2 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आलेल्या छापेमारीमध्ये 17 आरोपींना एनसीबीने अटक केली होती. यामध्ये शाहरुखच्या मुलाचाही समावेश होता. मात्र नंतर शाहरुखच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला.