मोहित कंबोज यांच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरु
भाजप नेते मोहित कंबोज हे सध्या ट्विटवॉरमुळे चर्चेत आहेत
माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे चर्चेत आले आहेत. मोहित कंबोज यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत राष्ट्रवादीच्या (NCP) मोठ्या नेत्याला अटक होऊ शकते असा दावा केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
यानंतर मोहित कंबोज यांनी रोहित पवार (NCP) यांचे नाव घेता टीका केली होती. “मी सध्या बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीचा अभ्यास करत आहे. यात मी त्यांच्या कंपनीच्या यशाचाही अभ्यास करत आहे. लवकरच मी या संदर्भात माहिती देईल. त्यामुळे तुम्हाला या कंपनीच्या यशामागील गोष्ट समजून घ्यायला मदत होईल,” असे कंबोज यांनी म्हटलं होतं.
त्यानंतर आता ट्विटवॉरला वेगळं वळण लागलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि प्रवक्ता असलेल्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मोहित कंबोज यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सांताक्रूझ पोलीस ठाण्यात विद्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्या चव्हाण यांनी दिलेल्या मुलाखतीत मोहित कंबोज आणि किरीट सोमया यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. तुमचे महाराष्ट्रात काम काय तुम्ही गुजरात ला जा असेही वक्तव्य चव्हाण यांनी केले होते.
यानंतर मोहित कंबोज यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केल्यानंतर विद्या चव्हाण यांनी हे वक्तव्य केले होते. त्यानंतर सांताक्रूझ पोलिसांनी भादवि 505 (2) , 37 (1) , 135 , 500 अंतर्गत गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान यामुळे विद्या चव्हाण यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.