बोट अपघाताला अतिवेग कारणीभूत, प्राथमिक चौकशीत माहिती
मुंबईतील बोट अपघाताला ही कारणे कारणीभूत?
मुंबई : अरबी समुद्रातील बोटीचा अतिवेग हे दुर्घटनेचं कारण असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी घडलेल्या या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. यातून काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्याचं समजतंय.
स्मारकाच्या स्थळी पोहोचण्यासाठी समुद्रात वळसा घालून जावं लागतं. मात्र वेळ वाचवण्यासाठी दीपगृहाजवळचा वेगळा मार्ग निवडण्यात आला. हा चुकीचा मार्ग होता. तसंच शिवसंग्राम संघटनेतल्या काही कार्यकर्त्यांचा अतिउत्साहदेखील नसल्याचं चौकशीत समोर आल्याची माहिती आहे. हा कार्यक्रम संपूर्णपणे सरकारी असूनही त्याला सागरी मंडळासह काही खासगी बोटी उपलब्ध करून देण्यात आल्या.
दरम्यान, बोट दुर्घटनेनंतर 'झी २४ तास'नं आज दुर्घटनास्थळी जाऊन आढावा घेतल्यानंतर नवी धक्कादायक माहिती उजेडात आली. बोट खडकाला आपटून नव्हे, तर समुद्रात काही वर्षांपूर्वी बुडालेल्या मोठ्या जहाजाच्या सांगाड्याला धडकली, अशी माहिती स्थानिक मच्छिमारांनी दिली आहे. १९९२ - १९९३ च्या सुमारास कुलाबा लाईट हाऊसजवळ हे जहाज बुडालं होतं. त्याचा सांगाडा अद्यापही तिथंच आहे. त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा सांगाडा वेळीच काढला असता तर कालची घटना टळली असती. दरम्यान, हा सांगडा आजही तेथेच आहे. त्यामुळे भविष्यातही दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील बुडालेला सांगाडा काढण्याची मागणी स्थानिक आणि मच्छिमारांनी केलेय.