BREAKING : अनिल देशमुख यांचे जावई आणि वकिल सीबीआयच्या ताब्यात
अनिल देशमुख यांच्यासंदर्भातला प्राथमिक चौकशी अहवाल लीक केल्याचा सीबीआयला संशय - सूत्र
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकिल आनंद डागा यांना सीबीआयने (CBI) ताब्यात घेतलं आहे. वरळीतल्या सुखदा इमारतीतून बाहेर पडत असताना गौरव चतुर्वेदी यांना ताब्यात घेण्यात आलं. एकूण 10 जणांच्या पथकाने ही कारवाई केल्याचं कळतंय.
याआधी अनिल देशमुख यांच्या दोन सचिवांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यासमोरच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीन चीट दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. या बातम्या सीबीआयच्या एका रिपोर्टच्या आधारे प्रसारित झाल्या होत्या. हा रिपोर्ट बाहेर गेला कसा याबाबत सीबीआय तपास करत असल्याची माहिती मिळतेय.
अनिल देशमुखांना ईडीचं समन्स
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांना आतापर्यंत पाचवेळा चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. पण एकदाही अऩिल देशमुख चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याव दबाव वाढवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे.
हम कहे सो कायदा, सचिन सावंत यांची टीका
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी यावर टीका केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी आज अनिल देशमुख यांचे जावई आणि त्यांच्या वकिलांना कुठल्याही नोटीसीशिवाय उचलून नेले असे कळते. हे अत्यंत गंभीर आहे. “देशात मोदीशाही चालू आहे. नियम कायदे गुंडाळले गेले आहेत. हम कहे सो कायदा आहे ” असे मोदी सरकारने अधिकृतपणे जाहीर करून टाकावे. जाहीर निषेध! असं ट्वीट करत सचिन सावंत यांनी सीबीआयच्या कारवाईवर टीका केली आहे.
काय आहे प्रकरण?
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले असल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना आठ पानी पत्र लिहिलं होतं. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर मोठ्या अस्थापनांकडून प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होतं, असं परमबीर सिंग यांनी या पत्रात म्हटलं होतं.
सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्स यूनिटचे हेड होते. त्यांना देशमुखांनी अनेकदा आपल्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवले होते. त्यावेळेला देशमुखांचे पर्सनल सेक्रेटरी असलेले पलांडे हे देखील हजर होते, असं परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात लिहिलं होतं.