मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयचे अधिकारी करणार आहेत. पाटण्याचे एसपी विनय तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आधीच सीबीआयच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. मुंबईत दुसऱ्या राज्यातून येणाऱ्यांना प्रथम मुंबई पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. जर ही परवानगी घेतली नाही तर नियमानुसार १४ दिवस क्वारंटाईन करावे लागेल, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी बजावले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतसिंह यांने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली होती. सुशांतसिंह आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करीत होते. मात्र, सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथे अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार राज्यातील पाटण्याचे पोलीस मुंबई येऊन तपास आणि चौकशी करीत होते. दरम्यान, कोविड-१९च्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर पाटण्याचे एसपी विनय तिवारी हे विमानाने मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना मुंबई महापालिकेने राज्य शासनाच्या नियमानुसार क्वारंटाईन करण्यात आले होते. यावरुन वाद निर्माण झाला. कालच त्यांना क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले होते. 


दरम्यान, सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा, अशी मागणी जोर धरु लागली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने याबाबत केंद्राकडे विचारणा केली. त्यावेळी केंद्र सरकारने स्पष्ट केले की, हा तबास सीबीआयकडे देण्यास काहीही हरकत नाही. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. आता सुशांत प्रकणाचा तपास सीबीआयचे अधिकारी मुंबईत येवून करणार आहेत. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीआय अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे. एसपी विनय तिवारी यांच्याप्रमाणे पुन्हा असा वाद होऊ नये, म्हणून पोलिसांची परवानगी घ्यावी, असे सांगत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची परवानगी घेतली नाही तर यापुढे इतर राज्यातून मुंबईत येणाऱ्यांना नियमानुसार क्वारंटाईन करावे लागेल. मुंबई महापालिकेने १४ दिवसांचा कालावधी क्वारंटाईनचा केला आहे. या नियमानुसार सीबीआयच्या अधिकाऱ्यांना राहावे लागेल, असे महापौर पेडणेकर म्हणाल्या.