सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यानी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेत त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.
मुंबई : सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यानी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेत त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे सिबीएसई बोर्डाच्या 10 वीच्या विद्यार्थ्याना फेरपरीक्षेला सामोरे जावे लागणार होते. मात्र बोर्डाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करीत ठाकरे विद्यार्थी आणि पालकांच्या बाजूनं ठामपणे उभे राहिले होते.
कुठल्याही परिस्थितीत फेरपरिक्षा देऊ नका, मनसे तुमच्या पाठिशी आहे अशी भूमिका ठाकरे यांनी व्यक्त केली होती. आणि योगायोग म्हणजे बोर्डानेही आपल्या निर्णयाचा फेरविचार करीत दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला. सीबीएसईची दहावीची फेरपरीक्षा महाराष्ट्रात होणार नाही. त्यामुळे 10 वी च्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी आज कृष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरे यांचे आभार मानले.
बातमीचा व्हिडिओ