पावसामुळे मध्य आणि हार्बर लोकल सेवा बंद
अत्यावश्यक सेवेतील लोकल पावसामुळे विस्कळीत
मुंबई : रात्रभर मुंबईसह उपनगरात पावसाने जोर धरला आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर तर परिणाम झाला आहे असून वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. अशातच अत्यावश्यक सेवेतील लोकलसेवेला देखील पावसाचा फटका पडला आहे. पश्चिम रेल्वे चर्चगेट ते अंधेरी वाहतूक ठप्प झाली आहे. अंधेरी ते विरार दरम्यान काही लोकल सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मध्य आणि हार्बर लोकल सेवा बंद करण्यात आली आहे.
पुढील २४ तासांत मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच दरम्यान मुसळधार पावसाचा फटका आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना होत आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या व भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर सौ किशोरीताई पेडणेकर यांनी विविध ठिकाणी पाहणी केली त्याप्रसंगी नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरीच राहावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पावसामुळे त्रास सहन करावा लागत आहे. लोकल सेवा ठप्प असल्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली आहे.