मध्य, हार्बर रेल्वे २४ तासानंतर रखडलेलीच
पावसाने विश्रांती घेतली असली तरी मुंबईकरांचे हाल कमी होताना दिसत नाही. सकाळी रेल्वे सेवा धिम्यागतीने सुरु झाली. मात्र, काही तासातच ठप्प पडलेय.
मुंबई : पावसाने विश्रांती घेतली असली तरी मुंबईकरांचे हाल कमी होताना दिसत नाही. सकाळी रेल्वे सेवा धिम्यागतीने सुरु झाली. मात्र, काही तासातच ठप्प पडलेय. पश्चिम रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत असून मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा २४ तासानंतरही रेल्वे वाहतूक खोळंबलेली आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे पुन्हा रखडली आहे. तर पश्चिम रेल्वेवर गाड्या धीम्यागतीने धावत आहेत.
रात्रभर पावसाच्या विश्रांतीने मुंबईतल्या बहुतांशी रस्त्यावर साठलेलं पाणी ओसरले आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरची वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे. शहरात ठिकठिकाणी बिघडलेल्या गाड्यांच्या रांगा दिसत आहेत. दरम्यान, मुंबापुरीवरचे काळे ढग उत्तरेला सरकले आहेत. त्यामुळे पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. उपग्रहाच्या ताज्या छायाचित्रांवरून सुधारित अंदाज तसा वर्तविण्यात आला आहे.
मुंबापुरीत मंगळवारी रेकॉर्डब्रेक पाऊस कोसळला. २६ जुलैनंतरच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रूझ ३१५ मिमी, कुलाबा १०१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पावसाच्या गैरहजेरीत पहाटे चार ते सात दरम्यानची भरती संपली आहे. त्यामुळे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. मुंबईची पाणीकोंडीतून सुटका झालेय. भरती ओसरल्यानंतर साचलेल्या पाण्याचा निचरा झालाय.