दादर स्टेशनवरील Platform Numbers बदलले! आता 1 असेल 8 तर...; पाहा 14 प्लॅटफॉर्मची यादी
Dadar Station New Number For Platforms: दादर स्टेशनवरील मध्य रेल्वेच्या मार्गावरील सर्वच प्लॅटफॉर्मचे क्रमांक बदलणार आहेत. हा बदल प्रवाशांना गोंधळात टाकणारा ठरु शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Dadar Station New Number For Platforms: मुंबईतील पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे वाहतुकीचं केंद्र बिंदू असलेल्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या क्रमांकामध्ये मोठा बदल केला जाणार आहे. पश्चिम रेल्वेसाठी असलेल्या प्लॅटफॉर्मचे क्रमांक आहेत तसेच राहणार असले तरी मध्य रेल्वेच्या मार्गावरील सर्वच प्लॅटफॉर्मचे क्रमांक बदलणार आहेत. हा बदल प्रवाशांना गोंधळात टाकणारा ठरु शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील काही आठवड्यांपासून मध्य रेल्वेवच्या मार्गावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 बंद करण्याचं काम सुरु होतं. हे काम आता जवळपास पूर्ण झाल्यानंतर आता मध्य रेल्वेनं यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे. कोणत्या प्लॅटफॉर्मला कोणता क्रमांक असेल हे सुद्धा मध्य रेल्वेने आपल्या एक्स अकाऊंटवरुन (ट्विटरवरुन) स्पष्ट केलं आहे.
सर्व प्लॅटफॉर्म क्रमांक बदलणार
27 सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेने सर्वात आधी प्लॅटफॉर्म क्रमांक बदलले जातील अशी घोषणा केली होती. आता हा बदल शनिवारपासून लागू होत असल्याचं मध्य रेल्वेने म्हटलं आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील प्लॅटफॉर्म क्रमांक जैसे थे राहणार आहेत. म्हणजेच पश्चिम रेल्वेसाठी वापरले जाणारे प्लॅटफॉर्म हे नंबर 1 पासून 7 पर्यंत असतील. मात्र मध्य रेल्वेवरील सर्व प्लॅटफॉर्म क्रमांक बदलले जातील.
संपूर्ण स्थानक एकत्रच ग्राह्य धरलं जाणार
आतापर्यंत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्मला स्वतंत्र ग्राह्य धरलं जात होतं. म्हणजेच प्लॅटफॉर्म क्रमांक 1 मध्य रेल्वेलाही होता आणि पश्चिम रेल्वेलाही होता. आता मात्र संपूर्ण दादर स्थानक हे एकत्रच ग्राह्य धरलं जाणार असून पहिले 7 प्लॅटफॉर्म हे पश्चिम रेल्वेसाठी असतील आणि मध्य रेल्वेचे प्लॅटफॉर्म हे 8 पासून सुरु होती. 8 ते 14 नंबरचे प्लॅटफॉर्म हे मध्य रेल्वेच्या वाहतुकीसाठी वापरले जातील. सध्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांकामध्ये कसा बदल होणार आहे पाहूयात...
असे असतील नवीन प्लॅटफॉर्म नंबर
मध्य रेल्वेचा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 यापुढे प्लॅटफॉर्म क्रमांक 8 म्हणून ओळखा जाईल.
मध्य रेल्वेच्या मार्गावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पूर्णपणे बंद करण्यात आला असून तो आता नव्या प्लॅटफॉर्म 8 चाच भाग असेल.
प्लॅटफॉर्म 3 हा प्लॅटफॉर्म 9 होणार आहे.
प्लॅटफॉर्म 4 हा प्लॅटफॉर्म 10 होणार आहे.
प्लॅटफॉर्म 5 हा प्लॅटफॉर्म 11 होणार आहे.
प्लॅटफॉर्म 6 हा प्लॅटफॉर्म 12 होणार आहे.
प्लॅटफॉर्म 7 हा प्लॅटफॉर्म 13 होणार आहे.
प्लॅटफॉर्म 8 हा प्लॅटफॉर्म 14 होणार आहे.
हे नवीन बदल 9 डिसेंबरपासून लागू होणार असल्याचं मध्य रेल्वेने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.