ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
लोकल किमान २० मिनिटं उशिरा...
मुंबई : सोमवारी मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्याचे परिणाम मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्यावर झाल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी सकाळच्या वेळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतून विस्कळीत झाली. त्यामुळे, प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं.
पावसानंतरच्या पहिल्या सकाळीच मध्य रेल्वेवरची वाहतूक विस्कळीत झाली. लोकल सेवा किमान वीस मिनिटं उशिराने धावत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सदा 'मरे' त्याला कोण रडे अशाच प्रतिक्रिया सर्वसामान्. प्रवाशांनी देण्यास सुरुवात करत या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
कल्याणहून मुंबईकडे येणारी वाहतूक उशिराने असल्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. अजून पावसाळ्याला सुरुवातही झाली नाही, तोच मान्सूनपूर्व सरींनीच मुंबईच्या लाईफलाईनवर परिणाम झाले. त्यामुळे ऐन पावसाळ्यात मुंबईकरांपुढच्या या अडचणी आणखी वाढणार, की कमी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.